Belagavi

ऑपरेशन बिबट्या : वनखात्याने हत्तींच्या चाऱ्यासाठी चोरला ऊस !

Share

बेळगाववासीयांची झोप उडवणाऱ्या बिबट्याला पकडण्यात अपयशी ठरलेल्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर आता हत्तींच्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस चोरल्याचा आरोप होत आहे.

होय, बेळगावमधील जाधव नगर येथे ५ ऑगस्ट रोजी बांधकाम कामगारावर हल्ला करून पळून गेलेला बिबट्या अद्याप सापडलेला नाही. वनविभाग आणि पोलीस विभागाच्या संयुक्त कारवाईनंतरही बिबट्या पकडला गेला नाही. अगदी अधिकाऱ्यांसमोर धावत जाऊन आपले अस्तित्व दाखवून दिल्यावरही या बिबट्याला पकडण्यात यश आले नाही. कालपासून सकरेबैल येथून आणलेल्या दोन हत्तींचा वापर करून वनविभागाने बिबट्याला पकडण्याची मोहीम सुरु केली आहे.

https://fb.watch/f71C-pDLBC/

मात्र, त्यांच्या हातूनही बिबट्या पकडणे शक्य होईल, याबाबत साशंकता आहे. वनमंत्री उमेश कत्ती यांच्या गृहजिल्ह्यातून बिबट्याला पकडण्याची हा खटाटोप संपूर्ण राज्यात मात्र चर्चेचा विषय बनला आहे. यापूर्वी उमेश कत्ती यांनी बेळगावात या मुद्यावर गांभीर्याने न बोलता हसण्यावारी नेत बेजबाबदारपणे विधान केले. त्यामुळे जनक्षोभ निर्माण झाला आहे. तशातच बिबट्याला पकडण्यासाठी  सकरेबैलू हत्ती कॅम्पमधून आणलेल्या दोन हत्तींसाठी मुतगा गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस त्यांना न विचारता तोडल्याचा आरोप वनविभागावर करण्यात आलाय.त्यामुळे वनखात्याचा आगावूपणामुळे आणखी एक गोंधळ झाला आहे. मुतगा गावचे शेतकरी राजू कणबरकर यांनी पत्रकारांशी बोलताना वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर आरोप केले. त्यांनी कोणतीही माहिती न देता २ गुंठ्यांतील ऊस तोडून नेला आहे. सकाळीच ऊस तोडणी करून घेऊन गेल्याची माहिती मिळाली. किमान माहिती तरी द्यायला हवी होती, पण न सांगताच उसाची तोडणी झाली. तीन वर्षांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यावेळी त्यांनी वाढलेला तीन टन ऊस वाचला. नुकसान भरपाई न दिल्यास ऊस चोरीची तक्रार दाखल करू, असा इशारा त्यांनी दिला.  गेल्या 20 दिवसांपासून बिबट्याला पकडण्यात अपयशी ठरलेले वनविभागाचे अधिकारी लोकांच्या जिवाशी खेळत असून त्यांनी आता शेतकऱ्यांच्या पिकांची चोरी केली आहे. गोल्फ कोर्सजवळच्या क्लब रोडवर सायंकाळनंतर अंधारात  प्रवास करण्यास लोक घाबरत आहेत, अशी परिस्थिती आहे. कारण येथील पथदिवे अनेक दिवसांपासून बंद आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्डाने वीजबिल भरले नसल्याने हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी येथील वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे येथील नागरिक बिबट्याच्या भीतीने जीव मुठीत घेऊन वावरत आहेत.

आता केवळ दिखावूपणासाठी बिबट्या पकडण्याची मोहीम सुरु आहे. वनमंत्री, जिल्हा प्रशासन आणि वनविभागाचे कोणीही अधिकारी गांभीर्याने विचार करत नसल्याची वस्तुस्थिती सध्या जनतेच्या रोषाचे कारण आहे. बिबट्याने कोणाचा जीव घेतला तर त्याला जबाबदार कोण..? वनविभागाच्या अधिकार्‍यांनी आपत्ती येण्याआधी बिबट्यांचा खेळ थांबवून गांभीर्याने बिबट्या पकडावा, अशी सर्वांची मागणी आहे.

Tags: