Belagavi

राजस्थानातील दलित मुलाच्या हत्येचा सीपीआयतर्फे निषेध

Share

राजस्थानात दलित विध्यार्थ्याला अमानुष मारहाण करून त्याचा जीव घेतल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आज बेळगावात भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

राजस्थानमधील एका दलित मुलाला झालेली मारहाण आणि त्यानंतर झालेल्या त्याच्या मृत्यूच्या घटनेच्या निषेधार्थ भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज, बुधवारी बेळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला.

त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांमार्फत राष्ट्रपती आणि राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांना या विषयीचे निवेदन सादर करण्यात आले.

याबाबत आमच्या इन न्यूज-आपली मराठीला अधिक माहिती देताना भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते गैबू जैनखान म्हणाले की, देश आज 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. मात्र, दलितांवर सातत्याने होणारे हल्ले पाहता देशाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालेले दिसत नाही. केवळ तहान भागवण्यासाठी भांड्याला हात लावल्यामुळे समानतेचा धडा शिकवणाऱ्या शिक्षकाने मुलावर जीवघेणा हल्ला केला. त्याच्यावर कठोर कारवाई करावी. तसेच दुसऱ्याला पैसे देणाऱ्या दलित शिक्षकाला ते परत मागितल्याने जिवंत जाळण्यात आले. गोध्रा येथील मुस्लिम महिलेवर सामूहिक बलात्कार केलेल्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. हा दलितांवर अन्याय आहे. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’चा संदेश देणाऱ्या पंतप्रधान मोदींना हा अन्याय दिसत नाही का, असा सवाल त्यांनी केला.

यावेळी ऍड. नागेश सातेरी, मंदा नेवगी, आर. व्ही. कुलकर्णी आदींसह सीपीआय-एमचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: