श्री गणेशोत्सवाचे काऊंटडाऊन सुरु झाले असून यादरम्यान विजापूरमधील दोन आजी माजी आमदारांमध्ये श्री मूर्ती विसर्जनावरून शीतयुद्ध सुरु झाले आहे. श्रीमूर्ती विसर्जन ऐतिहासिक विहिरीत व्हावे या गोष्टीचा अट्टहास माजी आमदारांनी धरलाय तर कोणत्याही परिस्थितीत या विहिरीत श्रीमूर्ती विसर्जन करू देणार नाही असा अट्टहास विद्यमान आमदारांनी धरलाय.. काय आहे हा नेमका वाद..? पाहुयात या खास रिपोर्टमधून…!
श्री गणेशाच्या प्रतिष्ठापनेचा दिवस जवळ आला असून यादरम्यान विजापूरमधील दोन आजी माजी आमदारांना मूर्ती विसर्जनावरून जुंपली आहे. माजी मंत्री आप्पासाहेब पट्टणशेट्टी आणि विद्यमान आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्यातील मूर्ती विसर्जनावरून सुरु असलेले वाक्युद्ध आता विजापुरात जनतेत वायरल झाले आहे!
विजापूरमधील ऐतिहासिक ताज विहिरीत श्री गणेश मूर्ती विसर्जन करण्यात यावे यासाठी माजी मंत्री अप्पासाहेब पट्टणशेट्टी यांच्या एसी ग्रुपच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. गेल्या ६ वर्षांपूर्वी या विहिरीत श्रीमूर्ती विसर्जनास प्रशासनाने बंदी घातली आहे. ऐतिहासिक ताज विहिरीचा विकास, या विहिरीतील पाणी दैनंदिन वापरासाठी वापरण्यात येत असल्याने या विहिरीत श्रीमूर्ती विसर्जनास बंदी घालण्यात आली आहे.
मात्र या विहिरीच्या पाण्याचा वापर होत नसल्याने या विहिरीत श्रुमुर्ती विसर्जित करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी अप्पासाहेब पट्टणशेट्टी तसेच गणेशोत्सव मंडळांनी केली आहे. ताज विहिरीशेजारी तात्पुरती श्री गणेशमूर्ती विसर्जनाची सोया करण्यात आली असून विसर्जनानंतर मूर्ती बाहेर काढताना मूर्तीला इजा पोहोचत आहे. यामुळे समस्त हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या जात असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्र्यांनी दिली आहे.
याचसंदर्भात आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी विजापूरमधील सिद्धेश्वर देवालयानजीक गणेशोत्सव मंडळांची बैठक घेऊन या सभेत ऐतिहासिक ताज विहिरीचे संवर्धन आणि जातं करण्यासाठी या विहिरीत श्रीमूर्ती विसर्जित करू नयेत असे आवाहन केले. आज आपण हि विहीर वाचविली तर भविष्यात अडचणी निर्माण होणार नाहीत. याच विहिरीतून सरकारी रुग्णालयातील रुग्णांना पाणी फिल्टर करून पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. भविष्यात याच विहिरीचे पाणी शहरातील नागरिकांना देखील पुरविण्यात येणार असून सदर पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी आपण पुढाकार घेतल्याचे ते म्हणाले. गणेशमूर्ती विसर्जनादरम्यान या भागात सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात येणार असून या विहिरीत कुणीही श्रीमूर्तींचे विसर्जन केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही यत्नाळ यांनी दिलाय.
विधानसभा निवडणुकांचे वारे आतापासूनच वाहायला सुरुवात झाली असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही आजी माजी आमदारांमध्ये सुरु झालेले शीतयुद्ध कोणत्या वळणावर येऊन थांबेल, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
विजयकुमार सारवाड, आपली मराठी, विजापूर


Recent Comments