Belagavi

दुसऱ्या दिवशीही पोलीस-वनखात्याकडून ‘ऑपरेशन बिबट्या’

Share

बेळगावात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आज दुसऱ्या दिवशीही ऑपरेशन बिबट्या सुरु केले आहे. वन कर्मचारी आणि पोलिसांच्या सहभागाने बिबट्याला पकडण्यासाठी आज सकाळपासून मोहिमेला प्रारंभ करण्यात आला आहे.

होय, गेल्या २० दिवसांपासून बेळगावकरांची झोप उडवलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनखाते आणि पोलिसांच्या सहभागाने संयुक्त मोहीम राबविण्यात येत आहे. काल अगदी नजरेच्या टप्प्यात आलेल्या बिबट्याने सगळ्यांना चकवा देत पळ काढला होता. कालचा दिवस अपयशी ठरल्यानंतर आज पुन्हा बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी भूल देणारी बंदूक घेऊन सज्ज झाले आहेत. बेंगळुरू येथून स्पेशल ड्रोन आणण्यात आले असून लपलेल्या बिबट्याचा शोध घेण्यासाठी जंग जंग पछाडण्यात येत आहे.

क्लब रोड परिसरात आज सकाळी ऑप्र्श्न बिबट्या नव्याने सुरु करण्यात आले. यावेळी बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनाके आणि सीसीएफ मंजुनाथ चव्हाण यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांकडून कारवाईची माहिती घेतली. ऑपरेशन बिबट्याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार अनिल बेनके म्हणाले की, गोल्फ मैदानाच्या परिसरातील 22 शाळांना बिबट्याच्या वावरामुळे सुट्टी देण्यात आली आहे. बिबट्याला पकडण्यासाठी आता दोन प्रशिक्षित हत्तींचा वापर करण्यात येणार आहे. आज सायंकाळपर्यंत हत्ती दाखल होण्याची अपेक्षा आहे. लोक आणि वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी ऑपरेशन केले जाईल. ते म्हणाले की, शालेय मुलांच्या हितासाठी आम्ही यापूर्वीच शालेय मुलांच्या पालकांची आणि शिक्षकांची बैठक बोलावून ऑनलाइन शिक्षणावर भर दिला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना सीसीएफ मंजुनाथ चव्हाण म्हणाले की, आम्ही बिबट्याच्या वर्तनाचे निरीक्षण करत आहोत. बिबट्याच्या कारवाईची माहिती वनमंत्र्यांना देण्यात आली आहे. शिमोगा जिल्ह्यातून हत्ती येत आहेत. बिबट्या झाडावर बसला असेल आणि तेथे वन कर्मचाऱ्यांना जाणे शक्य नसेल अशा ठिकाणी हत्तीद्वारे  बिबट्याचा शोध घेण्यात येईल. लागतील त्या सर्व वस्तू घेऊन बिबट्याचा शोध सुरु आहे. बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, आमदार अनिल बेनके यांनी वनविभागाचे आरएफओ आणि पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी तज्ज्ञ व वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी बिबट्याला पकडण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबाबत चर्चा केली.

बेळगावचे प्रभारी डीएफओ अँथोनी मरियम, डीसीपी रवींद्र गडाडी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चर्चेत भाग घेतला. बिबट्या शोधण्यासाठी 3 अत्याधुनिक इन्फ्रारेड ड्रोन, 120 वन कर्मचारी, 80 पोलीस कर्मचारी यांच्या सहभागाने संयुक्त मोहिम राबविण्यात येत आहे. काल ज्या ठिकाणी बिबट्या दिसला त्या ठिकाणी वन पोलीस कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत. हातात काठ्या आणि कोयते घेऊन वन कर्मचारी कारवाई करत आहेत. सततच्या पावसामुळे या मोहिमेत अडथळे येत असल्याची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली.

दरम्यान, अधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार अनिल बेनके म्हणाले की, आज सकाळपासून वनविभागाचे कर्मचारी गोल्फ मैदानावर बिबट्या दिसल्यापासून कारवाई करत आहेत. लोकांना त्रास होऊ नये यासाठी पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. याबाबत काल वनमंत्र्यांनी बैठक घेतली आहे. आज आम्ही बिबट्याला कोणत्याही परिस्थितीत पकडण्याच्या निर्णयाप्रत आलो आहोत. शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून ऑनलाइन शिक्षण घेण्याची सूचना करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांत बिबट्या सापडल्यास शाळा सुरू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना धोका होऊ नये म्हणून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करण्यासाठी वन विभागाने वेगाने मोहीम राबवून बेळगावातील नागरिकांची भीती दूर करावी, अशी मागणी जनतेने केली आहे.

Tags: