Belagavi

श्री गणेशोत्सव महामंडळाचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

Share

येत्या ३१ ऑगस्ट रोजी श्री गणेश चतुर्थी साजरी होत असून यंदाचा गणेशोत्सव उत्साहात आणि शांततेत पार पडावा, यासाठी मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या शिष्टमंडळाने सोमवारी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

 

यंदाचा श्री गणेशोत्सव दहा दिवसांचा असून बुधवार दि. ३१ ऑगस्ट ते शुक्रवार दि. ९ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. बेळगावमध्ये ३५७ हुन अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे कार्यरत असून त्यांना विविध सरकारी विभागांकडून परवानगी घेण्यासाठी रिसालदार गल्लीतील जुन्या मनपा इमारतीत तसेच टिळकवाडी येथील मनपा कार्यालयात परवाने मिळविण्यासाठी एक खिडकी योजना दोन आठवड्यांपूर्वी एकत्रितरित्या राबवावी.

शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था दूर करून त्यांची स्वच्छता करावी, श्रीमूर्ती आगमन आणि विसर्जनासाठी प्रत्येक रस्त्यावरील विद्युत तारांचे हेस्कॉमच्या वतीने योग्य नियोजन व्हावे, रस्त्यावर धोकादायकरीत्या आलेल्या झाडांच्या फांद्या छाटण्यात याव्यात, प्रमुख मार्गांवर तसेच चौकांमध्ये हॅलोजनची सोय करावी, चौकाचौकात आकर्षक विद्युत रोषणाई करावी, स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची सोय करावी, गणेशोत्सव पाहण्यास येणाऱ्या श्री भक्तांसाठी परिवहन विभागातर्फे रात्री उशिरापर्यंत बसची सोय करावी, प्रमुख मार्गांवर श्री भक्तांच्या सोयीसाठी गणेशदर्शन स्थळ नकाशाची व्यवस्था करावी, श्री भक्तांसाठी रात्रीपर्यंत उपहारगृहे सुरु राहू द्यावी, रावसाहेब गोगटे सर्कल ते मराठा मंदिर पर्यंतच्या उड्डाण पुलावर, तसेच विसर्जन मिरणुकीदिवशी शनिमंदिर ते कपिलेश्वर मंदिर चौकापर्यंत असणाऱ्या पुलाची तात्काळ डागडुजी करण्यात यावी, विविध ठिकाणी असलेल्या श्री मूर्ती विसर्जन तलाव परिसरात भाविकांसाठी गॅलरीची व्यवस्था करावी, विसर्जन मिरवणूक मार्गावरील मातीचे ढिगारे हलवून मार्ग मोकळा करण्यात यावा, हेल्पलाईन क्रमांकांची व्यवस्था करून त्यांची यादी जाहीर करावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.

या शिष्टमंडळात मध्यवर्ती गणेश महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण- पाटील, सरचिटणीस महादेव पाटील, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, माजी उपमहापौर सतीश गोरगोंडा,  गणेश दड्डीकर, सागर पाटील, आदींचा समावेश होता.

Tags: