संपूर्ण बेळगाववर दहशतीची छाया पसरवलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी उद्या शिमोगा जिल्ह्यातील सकरेबैलूर येथून दोन प्रशिक्षित हत्तींना आणून बिबट्याचा शोध घेण्यात येणार आहे. दोन–तीन दिवसांत बिबट्या जेरबंद होईल, असा विश्वास वनमंत्री उमेश कत्ती यांनी व्यक्त केला.
बेळगावात आज, सोमवारी वनविभागाच्या सभागृहात पोलीस आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री उमेश कत्ती म्हणाले की, गेल्या 20 दिवसांपासून बेळगाव जिल्ह्यातील चार ठिकाणी बिबट्या दिसला आहे. चिक्कोडी येथे सापडलेला बिबट्या अथणीमार्गे महाराष्ट्रात गेल्याची माहिती आहे. मुडलगी आणि सौंदत्ती येथे दिसलेला बिबट्या दहा दिवसांपासून पुन्हा दिसलेला नाही. बेळगावातील गोल्फ कोर्सजवळ गायब झालेल्या बिबट्याला सोमवारी सकाळी स्थानिकांनी प्रत्यक्ष पाहिले आहे. या माहितीच्या आधारे वनविभागाचे कर्मचारी व पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. कुशल अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. ऑपरेशनसाठी भूलतज्ज्ञांचीही नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी बिबट्याला गुंगीचे औषध देऊन दोन-तीन दिवसांत पकडू, असे आश्वासन दिले आहे.
दरम्यान, वनमंत्री कत्ती पुढे म्हणाले, बेळगाव गोल्फ ग्राउंडमध्ये लपलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शिमोगा जिल्ह्यातील सकरेबैल येथून दोन प्रशिक्षित हत्तींना आणले जात आहे. वनविभागाचे 120 आणि 80
पोलीस बिबट्या पकडण्याच्या मोहिमेत तैनात केले आहेत. गोल्फ मैदानातील बिबट्या पकडण्याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याच्या पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, जिल्हा प्रशासन, वनविभाग व पोलीस विभाग समन्वयाने काम करत आहेत. लवकरच बिबट्या पकडला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार अनिल बेनके, जिल्हाधिकारी नितेश पाटील, एसपी डॉ. संजीव पाटील, एसीएफ मल्लिनाथ कुसनाळ आदी उपस्थित होते.


Recent Comments