Belagavi

गणेश मंडपात सावरकरांचे छायाचित्र लावण्यास बंदी नाही : आमदार द्वयींची माहिती

Share

स्वातंत्र्यवीर वीर सावरकर यांचे छायाचित्र लावण्यावरून कर्नाटकात वादंग निर्माण झाला आहे. काँग्रेसने सावरकरांची प्रतिमा लावण्यास विरोध दर्शविल्यानंतर भाजप आता गणेशोत्सवात सावरकरांचे छायाचित्र लावण्यास पुढे सरसावला आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे विधान गांभीर्याने घेत भाजपच्या नेत्यांनी  आता सावरकरांचे छायाचित्र लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

होय, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सावरकरांचे छायाचित्र लावण्यास विरोध दर्शविल्यानंतर, राज्यभर तीव्र विरोध व्यक्त करण्यात आला. स्वातंत्र्यवीर वीर सावरकर यांची प्रतिमा फाडण्याच्या मुद्द्यावरून भाजप नेत्यांमध्ये आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. बेळगावातही सावरकरांचे चित्र लावण्याचा मुद्दा सध्या गाजत आहे. काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवादरम्यान सर्व गणेश मंडळांमध्ये सावरकरांची प्रतिमा लावण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

याच मुद्द्यावर बेळगाव येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार अभय यांनी गणेशोत्सवादरम्यान सावरकरांचे छायाचित्र लावण्याबाबत विचारलेल्या माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर दिले. हा मुद्दा संबंधित गणेशोत्सव मंडळांचा आहे. सावरकरांचे छायाचित्र लावणाऱ्या सर्व गणेश मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. बेळगावात ते रोखण्याची ताकद कोणाचीच नाही. कोणी विरोधात आल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, गणेशोत्सवासाठी बेळगावात केलेल्या तयारीबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, गणेशोत्सवापर्यंत प्रतीक्षा करा, आताच काही सांगणे चुकीचे ठरेल. या आधीच काही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला फोन करून सार्वजनिक गणेशोत्सवात सावरकरांचे छायाचित्र लावणार असल्याचे सांगितले आहे. सावरकर हे संपूर्ण देशाचे मार्गदर्शक होते. गणेश मंडपात त्यांचा फोटो लावणार असतील त्यांनी जरूर लावावा असे आ. अभय पाटील यांनी सांगितले.

त्याचवेळी, त्यांनी देशाला सावरकरांच्या योगदानासंदर्भात विरोधी पक्षांनी केलेल्या टीकेला कडक उत्तर दिले.  विरोधी पक्षांना किती ज्ञान आहे याचा पुन्हा एकदा अनुभव आला आहे. उपलब्ध कागदपत्रे तपासा.

सावरकरांसारखी कठोर शिक्षा देशातील कोणत्याही स्वातंत्र्यसैनिकाला झाली नाही. विरोधकांनी ते अभ्यासावे.  मुस्लीम बहुल भागात सावरकरांची छायाचित्रे लावू नयेत, असे सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे. उद्या हिंदूंनी मुस्लिम भागात फिरू नये, असे ते म्हणतील. मग ते म्हणतील की, मुस्लिमबहुल भागातील हिंदूंची घरे खाली करा, पुढे ते मुस्लिमांसाठी वेगळ्या देशाची मागणी करतात. ही काँग्रेसची परंपराच आहे. त्यामुळे आमचा त्यांना विरोध आहे, असे आ. अभय पाटील यांनी ठणकावले.

 

दरम्यान, बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके, यांनीही याच मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, बेळगावच्या प्रत्येक गल्ली-बोळात सावरकरांचे चित्र आहे जेथे गणेश विराजमान आहे. यावर आधीच चर्चा झाली आहे. सावरकर यांना बेळगावच्या हिंडलगा कारागृहात ब्रिटिशांनी ठेवले होते. तुरुंगात त्याचा फोटो लावला आहे. म्हणून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांचा फोटो लावणे अनिवार्य आहे. सावरकरांचे छायाचित्र लावण्यास सर्व मंडळांना प्रवृत्त केले जाईल. आम्ही स्वतः त्यांना सावरकरांचे चित्र देऊ. यात शंका नाही. सावरकरांचे स्मरण हे आपले कर्तव्य आहे, असे ते म्हणाले.

यावेळी, त्यांनी सावरकरांवर विरोधकांच्या टीकेबद्दल माध्यमांच्या एका प्रश्नाला उत्तर दिले की, सावरकर तुरुंगात होते. त्यांना काळ्यापाण्याची कठोर शिक्षा झाली. आपले तारुण्य त्यांनी देशासाठी तुरुंगात घालवले. विरोधी पक्षांना याबाबत काहीच माहिती नाही. विरोधी पक्षाला सावरकरांबद्दल काय माहिती आहे, असा सवाल त्यांनी केला. सावरकरांनी आपल्या लेखणीतून देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीव ओतला होता असे ते म्हणाले.

 

Tags:

ganesh mandtap abhay patil anil benake veersavarkar