राजस्थान येथे पाचवीमध्ये शिकणाऱ्या दलित विद्यार्थ्याला आपल्या माठातील पाणी पिण्यावरून मुख्याध्यापकाने जबर मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे त्या शिक्षकाला फाशी देण्याच्या मागणीसाठी बेळगावात दलित संघर्ष समिती–आंबेडकर वाद आणि आंबेडकर पँथर्सने मोर्चा काढला.
मुख्याध्यापकांच्या मारहाणीत जखमी झाल्याने विद्यार्थ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण देशभर त्या शिक्षकाच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. बेळगावातही दलित संघर्ष समिती-आंबेडकर वाद आणि आंबेडकर पँथर्सने मोर्चा काढून या घटनेचा तीव्र निषेध केला. शहरातील आंबेडकर उद्यान ते चन्नमा चौकापर्यंत कॅण्डल रॅली काढून चन्नमा चौकात श्रद्धांजली वाहण्यात आली व या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला.
त्या निष्पाप लहान मुलाला शिक्षकाने समजावून सांगितले असते तर चांगले झाले असते. पण त्या शिक्षकाने शिक्षकी पेशाला काळिमा फासण्याचे काम केले आहे. त्यामुळे त्याला फाशी द्यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.
यावेळी आंबेडकर पँथर्सचे श्रीनिवास तळवार, महांतेश तळवार, राजू तळवार, राजेश कांबळे, दुर्गांना कांबळे, दत्ता कांबळे, कुमार देवरमणी, राजश्री कांबळे, अनिता कांबळे, रफिक मिरचीवाले यांच्यासहित विविध संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.


Recent Comments