Khanapur

फोटोग्राफी व्यवसायात तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवा : आम. निंबाळकर

Share

फोटोग्राफी क्षेत्रात अलीकडे तंत्रज्ञानाचा अधिक वापर होत असून छायाचित्रकारांनी फोटोग्राफी व्यवसायात तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवावे, असा सल्ला आमदार अंजली निंबाळकर यांनी दिलाय.

खानापूर तालुका फोटोग्राफर आणि व्हिडीओग्राफच्या असोसिएशनच्या वतीने शिवस्मारक येथे जागतिक छायाचित्रण दिन आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आमदार अंजली निंबाळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष दीपक गुरव होते.

यावेळी बोलताना आम डॉ. अंजली निंबाळकर म्हणाल्या, छायाचित्रण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञाचा वापर हल्ली अधिक होत आहे. कृष्णधवल ते डिजिटल फोटोग्राफी इथपर्यंतचा प्रवास छायाचित्रकारांनी अनुभवाला आहे. स्मार्ट फोनच्या युगातही फोटोग्राफी व्यवसायाने आपले वेगळेपण आणि महत्त्व टिकवून ठेवले आहे. हे महत्व यापुढील काळातही असेच टिकून राहणार आहे. या क्षेत्रात करियरच्या दृष्टीने नव्याने पदार्पण करणाऱ्या तरुणांनी तंत्रज्ञान आणि शास्त्रोक्त छायाचित्रण तंत्रज्ञान अवगत करावे, असे आवाहन डॉ. अंजली निंबाळकर यांनी केले. ()

यावेळी महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर बोलताना म्हणाले, फोटोग्राफी उद्योगात टिकून राहण्यासाठी नवीन बदलांचा अवलंब करणे आवश्यक आहे. छायाचित्रांच्या माध्यमातूनच ऐतिहासिक घटना व परिस्थिती भावी पिढ्यांसाठी जतन करता येऊ शकते. अनुभव आणि ज्ञानाच्या बळावर नवनवे प्रयोग करून छायाचित्रण कलेमध्ये नवनवीन शोध लावण्याचा त्यांचा प्रयत्न व्हावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी माजी आमदार अरविंद पाटील बोलताना म्हणाले, एकमेकांशी स्पर्धा न करता एकमेकांना सहकार्य करून व्यवसाय आणि सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. छायाचित्रकार नेहमी पडद्यामागे असतो आणि सामान्य लोकांच्या जीवनातील आनंदाचे क्षण जिवंत करतो. त्याची सेवा मोजता येत नाही असे ते म्हणाले.

यावेळी छायाचित्रण तंत्रज्ञ अमित पवार यांनी आधुनिक छायाचित्रण तंत्रज्ञानाची माहिती दिली. या कार्यक्रमात ज्येष्ठ व्यावसायिक छायाचित्रकारांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास रवी काडगी, प्रकाश पाटील, मोहन पाटील, बसवराज मंडी, शिरीष बिर्जे, सतीश पाटील, चांगदेव आळ्ळोलकर, बेळगाव छायाचित्रकार संघाचे डी बी पाटील, संतोष पाटील आदी उपस्थित होते.

Tags: