Belagavi

बेळगावात आयटीबीपी कॅम्पमधून 2 एके 47 गायब

Share

भारतचीन सीमेचे रक्षण करणाऱ्या आयटीबीपी अर्थात इंडोतिबेट बॉर्डर पोलिसांच्या छावणीतून दोन एके-47 रायफल्स चोरीला गेल्याची खळबळजनक घटना बेळगावात घडली आहे.

होय, बेळगाव तालुक्यातील हलभावी येथील आयटीबीपी कॅम्पमध्ये सध्या नक्षल विरोधी अभियानाचे प्रशिक्षण शिबीर सुरू आहे. मदुराईहून या प्रशिक्षणासाठी आलेल्या आयटीबीपीच्या 45 व्या बटालियनचे सैनिक राजेश कुमार आणि संदीप मीना यांच्या AK-47 रायफल्स चोरीला गेल्या. 17 ऑगस्टच्या रात्री नेहमीप्रमाणे रायफल्स बंदोबस्तात ठेवण्यात आल्या होत्या. पण दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक रायफल्स गायब झाल्याचे दिसून आले. ही बाब कळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आपत्कालीन स्थिती जाहीर केली. पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

एके-47 रायफल्स शोधण्यासाठी गुन्हे शाखेच्या डीसीपी पीव्ही स्नेहा यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक नेमण्यात आले आहे. याप्रकरणी काकती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एकंदर सीमेवर पहारा देणाऱ्या सैनिकांकडे असलेल्या रायफल्स गायब होणे हा सध्या बेळगावात चर्चेचा विषय बनला आहे.

Tags:

ITBT