Chikkodi

चिक्कोडीतून जाणाऱ्या महामार्गावर मोठमोठे खड्डे

Share

चिक्कोडी शहरातून जाणाऱ्या महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे अपघातांना निमंत्रण देत असल्याने वाहनधारकांची ओरड सुरू आहे.

संकेश्वर-जेवर्गी राज्य महामार्गाची सुधारणा करून त्याचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्यात आले आहे. हा महामार्ग चिक्कोडी शहरातून जातो. बसवेश्वर सर्कल ते बीके कॉलेजपर्यंतच्या महामार्गाच्या या टप्प्यात  मोठमोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावरून दररोज शेकडो अवजड वाहने, बसेस व हलकी वाहने ये-जा करतात. शहरातील सोमवार पेठ वळणावर मोठा खड्डा पडला आहे. वाहनांचा वेग जरा अधिक असेल तर येथे नक्की अपघात होण्याची खात्री आहे. शहरातील केसी रोडवरून येणारे वाहनधारक सोमवारी पेठ वळणावर जमा झाल्याने वाहतूक कोंडी होत आहे. या रस्त्याच्या वळणाच्या मध्यभागी मोठे खड्डे निर्माण झाल्याने वाहने खड्ड्यात जात आहेत. त्यामुळे प्रवाशांना मार्गक्रमण करताना त्रास होत आहे.

बेळगावहुन विजापूर किंवा सांगलीकडे जाणारी वाहने या रस्त्यावरून ये-जा करतात. नॅशनल हायवे अथॉरिटीच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात वाहनचालक, प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे. चिक्कोडी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. मोठमोठ्या खड्ड्यांकडे अधिकाऱ्यांचे लक्ष नाही का? असा संतप्त सवाल वाहनचालकांतून केला जात आहे.

Tags: