निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतशी राज्याची दुसरी राजधानी असलेल्या बेळगाव जिल्ह्यात राजकीय रंग चढू लागला आहे. त्यातही जारकीहोळी कुटुंबातील मुले “तू पुढे का मी पुढे” अशी करत विविध उपक्रमांत सक्रिय झाली आहेत. सध्या अरभावी मतदारसंघात सर्वोत्तम जारकीहोळी पूर्णपणे सक्रिय झाले असून, सर्वोत्तम आपले चुलते भालचंद्र जारकीहोळी यांचा राजकीय वारसा चालविणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे.
2023 च्या विधानसभा निवडणुकीची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. मात्र तरीही बेळगाव जिल्ह्यात विद्यमान आमदार, माजी आमदार, इच्छुक आणि त्यांच्या कुटुंबीयांची जोरदार धावपळ सुरू झाली आहे. मतदारसंघातील सर्व कार्यक्रमांना ते न चुकता हजेरी लावतात आणि लोकांची मने जिंकण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात. आता जारकीहोळी घराण्याच्या आणखी एका वंशजाची अरभावी मतदारसंघात शानदार एन्ट्री झाली आहे. भीमशी जारकीहोळी यांचा मुलगा सर्वोत्तम काका भालचंद्र जारकीहोळी यांच्या मतदार संघात सक्रिय झाले आहेत. निवडणुकीचे वर्ष असल्याने भालचंद्र त्यांच्या अनुपस्थितीत विविध उपक्रम राबविण्यास सुरवात केली आहे. अरभावी मतदारसंघ हा भालचंद्र जारकीहोळी यांचा बालेकिल्ला असून भीमशी जारकीहोळी यांनी भाजपमध्ये स्वतःची अशी ओळख आहे. अरभावीत भालचंद्र यांचा उत्तराधिकारी सर्वोत्तम असणार का? अशी कुजबुज सुरु आहे. पक्ष संघटनेतील सर्वोत्तम यांची सक्रियता पाहता ही बाब खरी म्हणता येईल.
तसे पाहता जारकीहोळी कुटुंबातील नवी पिढी या ना त्या मार्गाने समाजकारण आणि राजकारणात आधीच सक्रिय झाली आहे. केपीसीसीचे कार्याध्यक्ष आणि यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांचा मुलगा राहुल, मुलगी प्रियांका आणि रमेश जारकीहोळी यांची मुले अमरनाथ आणि संतोष हे देखील त्यांच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून जोरदारपणे कार्यरत आहेत. त्यानंतर आता अरभावी मतदार संघात सर्वोत्तम खूप सक्रिय झाले आहेत. त्यामुळे जारकीहोळी कुटुंबातील तरुण मुलांच्या राजकारणात प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र प्रसार माध्यमांशी बोलताना सर्वोत्तम यांनी काहीशी वेगळी प्रतिक्रिया दिली आहे. ‘
राजकारणात प्रवेश वगैरे काही नाही. तरुणांमध्ये मिळून मिसळून तरुणांसाठी काम करावे या भावनेने मी कार्यक्रमात सहभागी होत आहे. भालचंद्र जारकीहोळी यांना पाहून खूप काही शिकता येते. मतदारसंघातील जनतेला मी त्यांच्याच घरचा मुलगा वाटतो. प्रत्येकजण आपल्याकडे कुटुंबातील सदस्यांप्रमाणे पाहतो. त्यांनी सामाजिक, राजकीय क्षेत्रात खूप काम केल्याचे सर्वोत्तम यांनी सांगितले.
जारकीहोळी कुटुंबातील तरुण मुले 2023 च्या निवडणुकीत रिंगणात उतरणार असल्याची चर्चा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात ऐकू येत आहे. त्यातच आता सर्वोत्तम यांना भालचंद्र जारकीहोळी यांचे उत्तराधिकारी म्हणून अरभावी मतदारसंघात बिंबवले जात आहे. अरभावीतील मतदार सर्वोत्तम यांना कसे स्वीकारतात हे पहावे लागेल.


Recent Comments