बेळगाव उत्तर विभागस्तरीय 2022-23 च्या क्रीडा स्पर्धाना आजपासून प्रारंभ झाला. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने खेळात सहभाग घेतला.
बेळगाव जिल्हा पंचायत, जिल्हा शिक्षण व साक्षरता विभाग, शहर गट शिक्षण अधिकारी कार्यालय आणि महांतेश नगर रहिवासी संघाच्या जनशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 2022-23 या वर्षाच्या उत्तर विभागस्तरीय वैयक्तिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन जिल्हा स्टेडियमवर करण्यात आले. संस्थेचे मानद सचिव संजीव पट्टणशेट्टी यांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहण करण्यात आले. संस्थेचे संचालक बसवराज सुलतानपुरी यांनी स्पर्धांचे उद्घाटन केले. जिल्हा शारीरिक शिक्षण अधिकारी डी. एस. डिग्रज यांनी क्रीडा ज्योत स्वीकारली. यावेळी विद्यार्थ्यांच्या आकर्षक पंथ संचलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
क्रीडाज्योत प्रज्वलित करून बोलताना गट शिक्षणाधिकारी रवी बजंत्री म्हणाले की, दोन वर्षांपासून कोरोनामुळे शैक्षणिक उपक्रम झाले नव्हते. आता परमेश्वराच्या कृपेने सर्व संकटे, दूर झाली आहेत. शैक्षणिक वर्ष 2022-23 हे दोन वर्षांच्या संकटातून बाहेर आले आहे आणि जोमाने भरलेले आहे. कोणताही खेळ जिंकणे किंवा हरणे याने काही फरक पडत नाही. त्यात सहभाग महत्त्वाचा ठरतो. सर्व मुलांनी निरोगी स्पर्धात्मक भावनेने सहभाग घेऊन नेहमी जोमाने सहभाग नोंदवून क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
युवा सबलीकरण व क्रीडा विभागाच्या उपसंचालक जिनेश फडणीस, माध्यमिक शारीरिक शिक्षक संघाचे अध्यक्ष आर. पी. वंटगोडी, माजी शारीरिक शिक्षण निरीक्षक एल. बी. नायक, मुख्याध्यापक एस.एम.बद्दूर, जेनिफर पाटील, मुख्याध्यापक ए. बी. पाटील व इतर शिक्षक अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर झालेल्या विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी आपली अप्रतिम कौशल्य दाखवले.


Recent Comments