Chikkodi

आ. गणेश हुक्केरी यांच्या हस्ते मृत सैनिकाच्या कुटुंबाला लाखाची मदत

Share

आमदार गणेश हुक्केरी यांच्याहस्ते मृत सैनिक सूरज सुतार यांच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.

चिक्कोडी तालुक्यातील येडूरवाडी गावातील शिपाई सूरज सुतार यांचा नुकताच प. बंगाल येथे अपघातात मृत्यू झाला. या पार्श्‍वभूमीवर आमदार गणेश हुक्केरी यांनी अन्नपूर्णेश्वरी फाऊंडेशनच्या वतीने मृतांच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांचा धनादेश प्रदान केला. आमदार हुक्केरी यांनी मृत सैनिकाच्या कुटुंबीयांची अडचण ओळखून शासनाचे सर्व सोपस्कार उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करण्याबरोबरच विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांच्या मार्गदर्शनानुसार अन्नपूर्णेश्वरी फाऊंडेशनच्या वतीने वैयक्तिक एक लाख रुपयांची मदत दिल्याचे सांगितले.   यावेळी बोलताना आमदार गणेश हुक्केरी यांनी मृत सूरजच्या आई-वडील व पत्नीला कोणत्याही परिस्थितीत हिंमत न हारण्याचे आवाहन केले. चिक्कोडी मतदारसंघ हा विकासाच्या बाबतीत राज्यात प्रथम क्रमांकाचा मतदारसंघ बनवणार असल्याचे सांगितले.

यावेळी काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष अनिल पाटील, आजी-माजी सैनिक, येडूर, येडूरवाडी, चंदूर व मांजरी गावातील काँग्रेस नेते व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags:

ganeshhukkeri chikkodi