अथणी विधानसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध भाजप मेगा लढत सुरू झाली आहे. निवडणूक जवळ येताच माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान विधान परिषद सदस्य लक्ष्मण सवदी आणि महेश कुमठळ्ळी यांच्यात पडद्याआडुन लढाई सुरू झाली आहे.

होय, राज्यात विधानसभा निवडणूक जवळ येत असतानाच बेळगाव जिल्ह्यातील अथणी मतदार संघात लक्ष्मण सवदी आणि महेश कुमठळ्ळी यांच्यात मोठी लढत सुरू झाली आहे. राज्यात विधानसभा निवडणूक जवळ आल्याने लक्ष्मण सवदी मतदारसंघात जोमाने कामाला लागले आहेत. माजी डीसीएम लक्ष्मण सवदी मतदारसंघात सक्रिय झाल्याने झोपडपट्टी विकास महामंडळाचे अध्यक्ष महेश कुमठळ्ळी यांना धक्का बसला. त्यामुळे आता दोन्ही भाजप नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे.
दरम्यान, आमदार महेश कुमठळ्ळी सवदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शासकीय कार्यक्रमाला अनुपस्थित होते. बेळगाव जिल्हा भाजपमध्ये लक्ष्मण सवदी, उमेश कत्ती व रमेश जारकीहोळी असे अंतर्गत ३ गट प्रबळ असून या गटांत मतभेद निर्माण झाले आहेत. आमदार महेश कुमठळ्ळी जारकीहोळी गटाचे अशी त्यांची ओळख आहेत. हा असंतोष दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे लक्ष्मण सवदी हे अथणी मतदारसंघावर वर्चस्व राखण्यासाठी मास्टर प्लॅन करत असल्याचे बोलले जात आहे.
अथणी मतदारसंघात 35 कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याच्या कामाचा प्रारंभ करण्याचा कार्यक्रम नुकताच झाला. सार्वजनिक बांधकाम मंत्री सी. सी. पाटील यांच्या हस्ते या कामाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी लक्ष्मण सवदी यांच्या समर्थकांनी मंत्र्यांच्या स्वागताच्या बॅनरमध्ये केवळ लक्ष्मण सवदी आणि त्यांचे पुत्र चिदानंद यांचा फोटो लावला होता. हे सर्व पाहता अथणी भाजपमध्ये आता सारे काही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. अथणी भाजपमध्ये आता मूळ भाजपवाले आणि बाहेरून भाजपमध्ये आलेले असा कलह यातून उघड झाला आहे.
आमदार कुमठळ्ळी हे मंत्री माधुस्वामी यांच्या उपस्थितीत गेल्या महिन्यात झालेल्या कार्यक्रमालाही अनुपस्थित होते. या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये भाजप विरुद्ध भाजप अशी लढत सुरू असल्याची चर्चा आता रंगली आहे.


Recent Comments