बेळगावच्या बुफा संघाने 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त बेळगाव येथे झालेल्या अखिल भारतीय-11ए प्रकाशझोतातील फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामना जिंकत इंडिपेंडेन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे.
माजी आमदार फिरोज सेठ आणि महानगर काँग्रेसच्या वतीने आणि प्लॅनेट स्पोर्ट्स अकादमीचे जिल्हाध्यक्ष राजू सेठ यांनी अखिल भारतीय-11ए फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते. यात कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा येथील 16 फुटबॉल संघ सहभागी झाले होते. लव्हडेल शाळेच्या मैदानावर मंगळवारी झालेल्या अंतिम सामन्यात बुफा संघाने दर्शन संघावर 1 गोलने विजय मिळवला.
बेळगावात सततच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर 20-20 मिनिटांच्या सत्रात अंतिम सामना पार पडला. या सामन्यात दोन्ही संघाच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. अखेर बुफा संघाने 1 गोल केला. मात्र दर्शन संघाला एकही गोल करता आला नाही आणि परिणामी बुफाच्या संघाला विजय मिळवता आला.
सामन्यानंतर झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती अमन सेठ यांच्या हस्ते अंतिम सामन्यात विजयी झालेल्या विजेत्या बुफा संघाला 51 हजार रुपयांचा धनादेश व ट्रॉफीचे वाटप करण्यात आले. तसेच उपविजेतेपद पटकावणाऱ्या दर्शन संघाला 25 हजार रुपयांचे पारितोषिक धनादेश व ट्रॉफीचे वितरण करण्यात आले.
यावेळी बोलताना अमन सेठ म्हणाले, आम्ही खूप स्पर्धा आयोजित करू शकतो. मात्र खेळाडूंमध्ये उत्साह नसेल तर सर्व काही वाया जाते. त्यामुळे खेळाची आवड निर्माण झाली पाहिजे. कोणत्याही खेळात परिश्रमपूर्वक सहभागी होऊन सर्वोत्तम कामगिरी केली पाहिजे. क्रीडा क्षेत्रातही चांगले भविष्य घडवता येते, हे तरुणांनी लक्षात घ्यावे असे आवाहन त्यांनी केले.
अशफाक घोरी, नसीर पठाण यांच्यासह अनेक मान्यवर व खेळाडू यावेळी उपस्थित होते.


Recent Comments