महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकातील आलमट्टी धरणाच्या पाण्याचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे केल्याची प्रशंसा केली आहे. महाराष्ट्रातील आधीच्या सरकारांनी केलेल्या आरोपांच्या उलट विधान त्यांनी केले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पूर आढावा बैठक घेतली. यावेळी बोलताना अतिवृष्टी होऊनही आलमट्टी धरणाच्या अधिकाऱ्यांनी चांगले काम केले, आलमट्टी धरणातून पाणी सोडण्याचे योग्य नियोजन केले असे उद्गार त्यांनी काढले. महाराष्ट्रातील पूर आटोक्यात आणण्यासाठी नदी रुंदीकरण तसेच नद्यांतील गाळ काढण्यासाठी कायमस्वरूपी आराखडा तयार करण्याच्या सूचना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
गेल्या वर्षी, महाराष्ट्र सरकारचे पाटबंधारे तज्ज्ञ वडनेरे यांच्या नेतृत्वाखालील समितीने सांगली, कोल्हापूर आणि महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये पुराचे कारण आलमट्टीतून सोडलेले पाणी नसल्याचा अहवाल दिला होता. आता तर खुद्द महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीच आलमट्टी अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे, हे विशेष.
आलमट्टीमध्ये सध्या मुख्य अभियंता असलेले सुरेश आणि अधीक्षक अभियंता बसवराज यांच्या नेतृत्वाखालील अभियंत्यांच्या चमूने महाराष्ट्र पाटबंधारे अधिकाऱ्यांच्या समन्वयाने आलमट्टी धरणाच्या जलव्यवस्थापनाचे काम हाती घेतले आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले आहे. खुद्द महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीच खरी परिस्थिती मान्य केली आहे, ही बाब आलमट्टी धरणाच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनबद्ध कारभाराची साक्ष देणारी आहे.


Recent Comments