Belagavi

कृपया आम्हाला घर बांधून द्या : कडोलीतील पीडितांचे सरकारला साकडे

Share

मुसळधार पावसाने तडे गेलेल्या बेळगाव तालुक्यातील कडोली गावातील ही दोन घरे कधीही कोसळू शकतात. कुटुंबीय जीवाच्या भीतीने जगत आहेत. कृपया आम्हाला घर बांधून द्या असे साकडे या पीडित महिला सरकारला घालत आहेत.

होय, मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जगणे अवघड झाले आहे. पावसाचे पाणी घरात शिरून राहणे कठीण झालेय. पावसाने भिजलेल्या घराच्या भिंती कोणत्याही क्षणी कोसळू शकतात. होय, तुम्ही पाहत असलेले हे दृश्य बेळगाव तालुक्यातील कडोली गावातील वैजनाथ गल्लीतील आहे. देमाव्वा विठ्ठल सायबन्नावर नावाच्या वृद्ध महिलेचे घर पाहून खरोखरच भीती वाटते. घराची एक बाजूची भिंत आधीच कोसळली आहे. अशा घरात ही आजी राहते. मंगला देवाप्पा पाटील यांच्या घरचीही तीच अवस्था आहे. पावसाचे पाणी घरात शिरले असून ते पाणी घराबाहेर काढण्यासाठी त्या धडपडत आहेत. हे घरही कोणत्याही क्षणी कोसळू शकते अशा स्थितीत आहे.घरात लहान मुलांसह वृद्ध महिला असून जीवाच्या भीतीने मनावर दगड ठेवून त्या जगत आहेत. तीन वर्षांपूर्वी या दोघांना घर दुरुस्तीसाठी प्रत्येकी ५० हजार रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली होती. त्यापैकी केवळ 25 हजार देमाव्वा विठ्ठल सायबन्नावर यांना आले. उर्वरित 25 हजार रुपये अद्याप आलेले नाहीत. संपूर्ण घरच  कोसळायला आले असताना ते दुरुस्त करणार तरी कसे, असा या महिलांचा प्रश्न आहे. घरात पाणी साचलेले असताना या घरात कसे राहायचे? घरात दोनवेळच्या जेवणाची भ्रांत आहे. आम्ही कसे तरी मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत आहोत. स्वखर्चाने घर कसे बांधायचे, अशी त्यांची कैफियत आहे.

एकंदर, बेळगाव जिल्ह्यातील बहुतांश पीडित कुटुंबांना पुरेशी भरपाई मिळालेली नाही. मात्र, आम्ही पीडितांना नुकसान भरपाई दिल्याचे अधिकारी व लोकप्रतिनिधी खोटे सांगत आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी ताबडतोब जागे व्हावे आणि या पीडितांना घरे बांधून द्यावीत अशीच सगळ्यांची अपेक्षा आहे.

Tags: