Belagavi

कमळाबाईच्या गोटातील नेत्यांत पुन्हा शीतयुद्ध

Share

निवडणुकीच्या तोंडावर कमळाबाईच्या गोटातील नेत्यांत पुन्हा शीतयुद्ध सुरू झाले आहे. बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी बेळगावातील बळ्ळारी नाल्यासंदर्भात होणाऱ्या बैठकीची माहिती स्थानिक आमदारांना न दिल्याने जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

होय, राज्यातील विधानसभा निवडणुका जवळ येत असताना, जिल्ह्यातील भाजप नेत्यांमध्ये पुन्हा शीतयुद्ध सुरू झाले आहे. बेळगावचे भाजप आमदार अभय पाटील यांनी जलसंपदा, तसेच जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ यांच्याविरोधात उघड नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत बेळगावात पत्रकारांशी बोलताना आमदार अभय पाटील यांनी, बेळगावातील बळ्ळारी नाला समस्येबाबत जिल्ह्याचे पालक मंत्री गोविंद कारजोळ यांनी बैठक बोलावली आहे. यासंदर्भात मंगळुरूच्या अधिकाऱ्यांची बैठक होणार असून स्थानिक आमदारांना बैठकीला बोलावण्यात आले नसल्याबद्दल आमदार अभय पाटील यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. कारजोळ साहेबांची सभा होत असल्याचे मला प्रसारमाध्यमांकडून समजले आहे. या बळ्ळारी नाल्याच्या प्रश्नाबाबत मी मुख्यमंत्री आणि कारजोळ यांची अनेकदा भेट घेतली आहे. शहरातील नागझरी नाला, लेंडी नाला, जक्केरी नाला यासाठी 100 कोटी रुपये यापूर्वीच मंजूर करण्यात आले आहेत. याला मुख्यमंत्र्यांनी तत्वत: मान्यता दिली आहे. येत्या डिसेंबरपासून हे काम सुरू होणार आहे. बळ्ळारी नाला माझ्या मतदारसंघात आहे. पूर्वीचे सगळे जिल्हा पालकमंत्री माझी दखल घेत असे. या बैठकीबाबत जिल्हा पालक मंत्र्यांनी माझ्या निदर्शनास आणून दिलेले नाही. बळ्ळारी नाल्याचा मोठा भाग माझ्या मतदारसंघात येतो, यापूर्वी बसवराज बोम्मई, उमेश कत्ती, जगदीश शेट्टर साहेब हे बेळगाव जिल्हा पालक मंत्री होते. आमच्या मतदान संघात आल्यावर ते माझी दखल घेत. पण या पालक मंत्र्यांनी मला विश्वासात न घेता, माहिती न देता बैठकीचे नियोजन केले आहे, असे सांगत अभय पाटील यांनी संताप व्यक्त केला.

राज्यातील निवडणुकांपूर्वीच भाजप नेत्यांमध्ये या असंतोषाची ठिणगी पडली आहे. त्यातच आमदार अभय पाटील यांना जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ यांनी बैठकीचे निमंत्रण न दिल्याने त्यांच्याविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. आता यावर जिल्हा पालक मंत्री काय भूमिका घेतात, हे पहावे लागेल.

Tags: