बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वावर भाजप नेते आणि आमदारांचा विश्वास नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बदली करण्याच्या उद्देशानेच गृहमंत्री अमित शहा बंगळूरमध्ये आले होते, असा नवा गौप्यस्फोट विधान परिषद सदस्य नागराज यादव यांनी केला आहे.
बेळगावमधील प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हि प्रतिक्रिया दिली असून काँग्रेसने केलेल्या ट्विटशी मी सहमत असल्याचे सांगितले. राज्य मंत्रिमंडळालाच बोम्मईंचे नेतृत्व मान्य नसून केवळ प्रसारमाध्यमांसमोर आपल्याला पाठिंबा असल्याचे सांगून स्वतःचीच फसवणूक करत आहेत. जनतेत भ्रष्टाचाराबद्दल प्रचंड संताप असून भाजपविरोधी लाट नक्कीच येईल. जनतेलाही बसवराज बोम्मई यांचे नेतृत्व मान्य नाही मात्र मुख्यमंत्र्यांना हि बाब समजत नसल्याचा टोला त्यांनी लगावला.
मंगळूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या भागाचा दौरा केला. यावेळी माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याशी त्यांनी स्वतंत्र बैठक घेतली. निवडणुका जवळ आल्या कि राजकारणात नवे नेतृत्व आणून जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम भाजप करत असल्याची टीका नागराज यादव यांनी केली.
भाजप आमदारांचाच मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही. त्यांच्याकडे नेतृत्वाचा अभाव असून काँगेसमधील सिद्धरामय्या, डीके शिवकुमार, मल्लिकार्जुन खर्गे, परमेश्वर यांसारखे योग्य नेते नाहीत. यासाठी नेतृत्वात बदल करण्याच्या उद्देशाने अमित शहा बंगळुरूला आले आणि येडियुरप्पा यांच्याशी वेगळी बैठक घेतली, असा नवा गौप्य्स्फोट नागराज यादव यांनी केला.
गुजरातमध्ये संपूर्ण मंत्रिमंडळातच बदल करण्यात आला. मध्यप्रदेशमध्ये शिवराजसिंह चव्हाण यांच्या ऐवजी नवा आणि तरुण चेहरा पुढे आला. असाच बदल त्रिपुरामध्येही करण्यात आला. निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री बदलून नव्या नेतृत्वाला संधी देण्याची भाजपची जुनी रणनीती आहे. त्यामुळे बोम्मई आपला कार्यकाळ पूर्ण करणार नाहीत, अशी भविष्यवाणी नागराज यादव यांनी वर्तविली आहे. ()


Recent Comments