मूडलगी तालुक्यातील कल्लोळ्ळी गावातील १९० हुन अधिक कुटुंबे गेल्या ४० वर्षांपासून सरकारी गायरान जमिनीवर वास्तव्यास आहेत. सदर जमीन येथील स्थानिक रहिवाशांच्या नावे करून हक्कपत्र देण्यात यावीत, अशी मागणी करत येथील ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील बसवनगर येथील कल्लोळ्ळी गावात १७ एकर हुन अधिक जमीन सरकारी गायरान जमीन आहे. या जमिनीवर १९० हुन अधिक कुटुंब वास्तव्यास आहेत. यासंदर्भात २०१२ मध्ये अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावेळी तहसीलदारांनी आपल्याला हक्कपत्र देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता त्याच जमिनीवर शाळा आणि क्रीडांगण बांधण्यासाठी परवानगी अर्ज केल्याची माहिती उजेडात आली असून हि जमीन आपल्या नावावर करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे कल्लोळ्ळी ग्रामस्थांनी केली आहे.
यावेळी प्रसारमाध्यमांसमोर आपली व्यथा सांगताना महादेव कोडलीवाड यांनी संपूर्ण परिस्थिती कथन केली. गेल्या ४० वर्षांपासून या गावातील गायरान जमिनीवर गरीब कुटुंब आपला चरितार्थ चालवत असून २०१२ साली आपण अक्रम संक्रम योजनेसाठी अर्ज दाखल केला होता. २०१६ साली तहसीलदारांनी या जमिनीची मालकी आपल्याला देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. परंतु आजतागायत ते पूर्ण करण्यात आले नाही. याबाबत मुख्यमंत्री, पालकमंत्री, महसूल मंत्री यासर्वांकडे अर्जदेखील करण्यात आला असून आता या जमिनीवर शाळेची इमारत आणि क्रीडांगण बांधण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. हि जमीन आपल्या नावावर करण्यात यावी, अशी मागणी करण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत असल्याचे ते म्हणाले.


Recent Comments