Chikkodi

कृष्णा आणि उपनद्यांच्या पाणीपातळीत वाढ , नदीतीरावरील जनतेने सतर्क राहावे

Share

महाराष्ट्र राज्यातील राजापूर बॅरेज मधून १ लाख क्युसेक आणि दूधगंगा नदीतून २९ हजार क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग झाला असून चिकोडी तालुक्यातील कल्लोळ जवळील कृष्ण नदीच्या पाणी पातळीत सुमारे १ लाख ३० हजार क्युसेक पाण्याची आवक झाली आहे. यामुळे पाणी पातळीत वाढ झाली असून या भागातील नागिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी संतोष कामगौड यांनी केले आहे.

चिकोडी मिनीविधानसौध सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हि माहिती दिली आहे. कोयना डॅम परिसर तसेच राज्यातील नदीकाठच्या परिसरात पावसाचा जोर कमी झाला असला तरी पाण्याची आवक वाढली आहे. यामुळे नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे, जनावरे नदीकाठावर जाणार नाहीत याची काळजी घ्यावी, दोन्ही राज्यातील अभियंते कृष्ण नदी पातळीच्या नियंत्रणासंदर्भात समन्वयाने काम पाहणार आहेत, अशी माहिती संतोष कामगौड यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आयोजित केलेल्या हर घर तिरंगा अभियानासंदर्भात चिकोडी उपविभागातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्यासाठी जनतेने सहकार्य करावे, चिकोडीतील २ लाख घरांवर तिरंगा ध्वज फडकविण्याचे उद्दिष्ट असून महापालिका, शिक्षण विभाग, ग्रामपंचायत आणि संघ संस्थांच्या माध्यमातून या अभियानासंदर्भात जागृती करण्यात आल्याचे ते म्हणाले.

स्वातंत्र्यदिनी चिकोडी परिसरात १३ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले असून शहरातील परटी नागलिंगेश्वर भवनपासून बसवसर्कल, बस स्थानक ते आंबेडकर पुतळा असा रॅलीचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. या रॅलीत ५ हजारहून अधिक जनता सहभागी होणार असल्याची माहिती नगरपालिका अध्यक्ष प्रवीण कांबळे यांनी दिली.

यावेळी तहसीलदार चिदंबर कुलकर्णी, राज्य सरकारी कर्मचारी संघाचे अध्यक्ष बी डी कुंभार, नगरपालिका मुख्याधिकारी डॉ. सुंदर रोगी आदी उपस्थित होते.

Tags: