नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्हापालक मंत्री उमेश कत्ती यांनी आज जिल्हा पंचायत कार्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात पिकांचे नुकसान झाले आहे. घरांचे नुकसान, शाळेच्या इमारतींचे नुकसान यासह इतर हानीसाठी महसूल, कृषी, फलोत्पादन, शिक्षण यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित सर्वेक्षण करून आठवडाभरात अहवाल सादर करावा, अशा सूचना या बैठकीत अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांवर अन्याय होता कामा नये. त्यामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही करावी, अशी सूचनाहि मंत्री उमेश कत्ती यांनी केली. सध्या जिल्ह्यात मुबलक पाऊस झाला आहे. यामुळे पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना बियाणांचा तुटवडा होणार नाही याची काळजी घ्यावी, अपुऱ्या बियाण्यांच्या साठ्याकडे लक्ष द्यावे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मोठ्या प्रमाणात चिकू आणि तुरीच्या बियाणांची व्यवस्था करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
विजापुर तालुक्यात एकूण ९९ घरांचे नुकसान झाले असून यापैकी ७८ घरांची नियमानुसार भरपाई यापूर्वीच देण्यात आली आहे. आता १७ घरांची नुकसान भरपाई प्रलंबित असल्याची माहिती जिल्हाधिकारी विजय महांतेश दानम्मानवर यांनी दिली.
यावेळी आमदार सोमनगौडा बी पाटील, सासनूर जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे, जिल्हा पोलीस वरिष्ठाधिकारी एच डी आनंदकुमार, अपर जिल्हाधिकारी रमेश कळसद आणि इतर उपस्थित होते.
यावेळी मंत्री उमेश कत्ती यांनी अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि देण्यात आलेल्या आतापर्यंतच्या भरपाईची माहिती दिली. ऑगस्ट महिन्यात पूर आणि अतिवृष्टीमुळे विविध तालुक्यांतील अंदाजे एकूण ११,२३६ हेक्टर क्षेत्रावरील तूर, सूर्यफूल, कापूस, ऊस, ज्वारी, मका, अशा अनेक पिकांचे नुकसान झाले असून मुसळधार पाऊस आणि पुरामुळे बबलेश्वर आणि तिकोटा तालुक्यात अंदाजे २३६ हेक्टर बागायती पिकांचे नुकसान झाल्याचे ते म्हणाले. या संदर्भात संयुक्त सर्वेक्षण सुरू असून सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर नियमानुसार नुकसान भरपाई करण्यात येणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पायाभूत सुविधांचेहि नुकसान झाले आहे अशी माहिती उमेश कत्ती यांनी दिली.


Recent Comments