निरोगी व सुशिक्षित समाज घडविण्यासाठी बेळगाव येथे १० ऑगस्ट रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जंतनाशक मुले-निरोगी मुले’ या घोषवाक्यांतर्गत बुधवारी महंत भवन येथे राष्ट्रीय जंतनाशक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सुशिक्षित समाज घडविण्याच्या उद्देशाने सर्व विभागांनी लक्ष पुरविले आहे. पण पोषक मुले निर्माण केल्याशिवाय सुशिक्षित समाज निर्माण होऊ शकत नाही, असे मत पालिका आरोग्याधिकारी डॉ. संजय डुम्मगोळ यांनी व्यक्त केले. जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमांनुसार सुदृढ आणि सुशिक्षित समाज घडविणे गरजेचे असून जंतनाशक गोळ्यांचे सेवन केवळ लहान मुलेच नाही तर प्रौढांनाही करावे, वर्षातून दोनवेळा आरोग्याच्या दृष्टिकोनातून या गोळ्या सेवन कराव्या, असे आवाहन त्यांनी केले.
बीईओ रवी भजंत्री बोलताना म्हणाले, अशक्तपणा, पोषणाची कमतरता आणि इतर आरोग्य समस्या टाळण्यासाठी वर्षातून दोनदा जंतनाशक गोळ्या मुलांना दिल्या जातात. या गोळ्या प्रौढांनाही घेतल्या तर चालतात अशी माहिती त्यांनी दिली.
आरसीएचयू डॉ. कंकणवाडी बोलताना म्हणाले, आजकाल मुलांमध्ये पालेभाज्या, पोषक आहाराचे प्रमाण कमी होऊन पाश्चात्य संस्कृतीच्या अन्नाचे सेवन होत आहे. पिझ्झा, बर्गर यासारख्या फास्टफूडचे सेवन हल्लींच्या मुलांमध्ये वाढले असून यामुळे पौष्टिक अन्न कमी पडत आहे. पौष्टिक अन्नामुळेच पोषण मिळू शकते. आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, माहिती विभाग व इतर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही वर्षातून दोनदा जंतमुक्तीसाठी कार्यक्रम आयोजित करतो, असे ते म्हणाले. यावेळी मुलांनी जेवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत, असा सल्लाही त्यांनी दिला.()
या कार्यक्रमास बसवराज यल्लनट्टी, ग्रामीण सीडीपीओ सी एस सुकनुरे, नगर सीडीपीओ लक्ष्मण भजंत्री, अक्षर दासोह एपी आर सी मुदकनगौडर, नगरसेवक लक्ष्मी राठोड, रेखा हुगार, हणमंत कोंगाली, राजशेखर डोणी, वकील बसवराज सुलतानपुरी आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments