शॉर्टसर्किटने घराला लागलेल्या आगीत सुमारे ५ लाख रुपये किंमती संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. ही घटना बेळगावातील गोवावेसजवळील गोकुळनगर पहिला क्रॉस येथे सोमवारी सायंकाळी घडली.
गोकुळनगर पहिला क्रॉस येथील प्रशांत घाटगे हे कुटुंबासमवेत कामानिमित्त बाहेर गेले असता, त्यांच्या घराला शॉर्टसर्किटने आग लागली. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडलेल्याया घटनेनंतर त्यांच्या घरातून धूर येऊ लागल्याचे पाहून शेजाऱ्यांनी घाटगे यांना याची माहिती दिली. त्यांनी तातडीने घरी धाव घेतली. या दरम्यान अग्निशामक दलाला बोलावण्यात आले.
अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र तोवर घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे, कपडे, भांडी आणि संसारोपयोगी साहित्य आगीत भस्मसात झाले. सुमारे ५ लाख रुपये किंमतीचे साहित्य जळून खाक झाले आहे. आग लागली तेव्हा घाटगे कुटुंबीय बाहेर गेले असल्यानेच सुदैवाने प्राणहानी टळली. टिळकवाडी पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे.


Recent Comments