खानापूर तालुक्यात गेल्या दोन महिन्यांत पावसामुळे कोसळलेल्या घरांच्या सर्वेक्षणाचे काम व्यवस्थित झाले नाही. अनेक घरे पडून देखील मदत यादीतून ती वगळण्यात आल्याचा आरोप पिडीतांनी केला आहे.

खानापूर तालुक्यातील केरवाड ग्राम पंचायत हद्दीतील हंदुर गावात दोन महिन्यांपूर्वी सततच्या पावसामुळे शोभा हिरेमठ यांच्या घराचे मोठे नुकसान झाले होते. घर कोसळल्याबाबत अनेकवेळा अधिकाऱ्यांकडे दाद मागितली. पण कोणीही प्रतिसाद देत नाही. खानापूर तहसीलदारांकडे दाद मागूनही कार्यवाही होत नसल्याचा अनुभव त्यांना आलाय.

या संदर्भात बोलताना शोभा हिरेमठ म्हणाल्या की, आम्ही गरीब, कुळी काम करून आमची उपजीविका चालवतो. पावसामुळे संपूर्ण घराची पडझड झाली. दिलासा मिळण्याच्या आशेने सादर केलेला अर्ज अधिकाऱ्यांनी फेटाळला आहे. तातडीने घरांचे फेरसर्वेक्षण करून नवीन घर बांधण्यासाठी योग्य ती भरपाई मा. जिल्हाधिकार्यांनी द्यावी, असे आवाहन त्यांनी प्रसारमाध्यमांमार्फत केले.
यावेळी बोलताना एका ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितले की, गरिबांना घरांसाठी मदतीकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. ज्यांनी आपले घर गमावले ते सर्व गरीब आहेत. आता ते अडचणीत आले आहेत. त्यांनी याबाबत आवाज उठवला आहे, सर्व अर्जदारांना योग्य तो दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने कार्यवाही करावी, अशी विनंती त्यांनी केली.
यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्ष, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments