महत्वपूर्ण जागतिक संस्था आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स ९ च्या माध्यमातून बेळगाव स्मार्ट सिटी कामकाजाला प्रथम स्थानाचे मानांकन देण्यात आले आहे. हे निकष कोणत्या आधारावर करण्यात आले आहेत हे तपासण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय पथकाची स्थापना करावी अशी मागणी आम आदमी पक्षाचे उत्तर विभागाचे प्रभारी राजकुमार टोपाण्णावर यांनी केली आहे.
शनिवारी बेळगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देशात होत असलेल्या विकासकामांमधील सर्वात वाईट दर्जा हा बेळगावमधील विकासकामांचा आहे. स्मार्ट सिटी योजने अंतर्गत ६०० कोटी रुपये खर्चून रस्ते, गटारी यासह इतर विकासकामे करण्यात आली असून हि कामे दर्जाहीन असल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात पंतप्रधानांनी बेळगावला केंद्रीय पथक पाठवून या कामांची पडताळणी करावी अशी मागणी त्यांनी केली. ()
विकासकामांसाठी मिळणाऱ्या निधीच्या गैरवापराबाबतदेखील त्यांनी तक्रार केली असून राजकालव्याच्या दुरुस्तीसाठी ७० कोटी रुपये खर्चुनदेखील दुरुस्ती योग्य प्रकारे झाली नसल्याचे ते म्हणाले. नाल्यांची दुरुस्ती न झाल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. यामुळे गटारी भरून पाणी रस्त्यावर येत आहे. घराघरात पाणी शिरत आहे. भाजप आमदारांनी स्मार्ट सिटी प्रकल्प डबघाईला आणला असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेची दिशाभूल करण्यात येत असल्याचाही आरोप त्यांनी केला.
बेळगाव स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरात बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे निष्कीऱ्या असून एकही काम योग्यपद्धतीने होत नसल्याचे टोपाण्णावर म्हणाले. स्मार्ट सिने टीच्या अधिकाऱ्यांनी लोकांची दिशाभूल करण्याचा सपाटा लावला आहे. स्मार्ट सिटीच्या ढिसाळ कारभाराबाबत यापूर्वीच एसीबीमध्ये तक्रार करण्यात आली असून, जिल्हा प्रशासन पथदिव्याचे खांब बसविण्यात निष्काळजीपणा करत असल्याचे ते म्हणाले. वारंवार पथदीप बसविणे, लावणे, फुटपाथवरील विजेचे खांब या सर्व गोष्टी कोणत्या नेत्याला खुश करण्यासाठी करण्यात येत आहेत? असा सवाल देखील राजू टोपाण्णावर यांनी उपस्थित केला. ()
या पत्रकार परिषदेला शंकर हेगडे, फयाज अहमद सौदागर, जुनेद सैय्यद एम के सय्यद आदींसह इतर आप कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments