Belagavi

कर्नाटक स्टेट ऑर्थोपेडिक असोसिएशनची ४७ वी परिषद

Share

कर्नाटक स्टेट ऑर्थोपेडिक असोसिएशनच्या वतीने ४७ व्या परिषदेचे आयोजन आयोजित करण्यात आले असू ७ दिवसीय सांधेदुखी सप्ताह साजरा करण्यात येत आहे, अशी माहिती कर्नाटक ऑर्थोपेडिक असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अश्विनीकुमार सिंग यांनी दिली.

शहरात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हि माहिती दिली आहे. बेळगावमधील बास, जेएनएमसी आणि बीम्स यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन कर्णयुगात आले आहे. दरवर्षी १ ते ७ ऑगस्ट या दरम्यान हाडे आणि सांध्यांसंदर्भात आजाराशी निगडित सप्ताह आयोजित केला जातो. तसेच ४ तारखेला हाडे आणि सांधे दिन म्हणून साजरा केला जातो, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

२०१२ पासून हा सप्ताह आयोजित करण्यात येत असून या अंतर्गत हाडे आणि सांधे कसे मजबूत होतील, यासंदर्भातील उद्देश डोळ्यासमोर ठेवून कार्य करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. प्रत्येकाने प्रत्येकाचे रक्षण करावे, हे ब्रीद वाक्य घेऊन आपण हा उपक्रम साजरा करतो, असे डॉ. अश्विनीकुमार सिंग म्हणाले. अपघातातील जखमींच्या मदतीला लोकांनी आवश्यक जावे. अनेकजण पोलिसांच्या भीतीने मदतीसाठी जाण्यास टाळाटाळ करतात मात्र जखमींना मदत करण्यासाठी तत्परता दाखवणाऱ्यांना बक्षिसे देण्यात यावीत, असे विचार त्यांनी व्यक्त केले.

डॉ. अश्विनीकुमार पुढे म्हणाले, या कामासाठी १ लाख ५० हजार जणांना वैयक्तिकरित्या प्रशिक्षण देण्याचे काम देशभरात सुरु झाले आहे. अपघात झाल्यानंतर पोलीस आणि रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांइतकीच जनतेची भूमिका महत्त्वाची असते. अपघातानंतर पहिल्या अर्ध्या तासाला आपण सोनेरी काळ म्हणतो. या काळात आपण कोणत्या जबाबदारीने वागावे हे जर प्रत्येकाला समजले तर अपघातामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत घट होऊन हजारो लोकांचे प्राण वाचू शकतात, असे ते म्हणाले.

Tags: