Belagavi

भक्तिपूर्ण वातावरणात वरमहालक्ष्मी व्रताचे आचरण

Share

श्रावण हा व्रत-वैकल्यांचा महिना असून, श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व अगदी वेगवेगळे आहे. व्रतवैकल्य, मंगलमय वातावरण यांचा मेळ साधणाऱ्या श्रावणात शुक्रवारी केल्या जाणाऱ्या लक्ष्मी व्रताला अनन्य महत्व आहे. श्रावणातील दुसरा शुक्रवार तसेच पौर्णिमेच्या मुहूर्तावर असणाऱ्या शुक्रवारी देखील श्रावणगौरी, वरदलक्ष्मी किंवा वरामहालक्ष्मी अशा नवे संबोधतात. बेळगावमध्येही आज स्त्रियांनी मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात या व्रताचे आचरण केले.

श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी श्री लक्ष्मी व्रत केले जाते. यात प्रामुख्याने श्रावणातील दुसऱ्या शुक्रवारी सुवासिनींनी ओटी भरणे, देवीच्या रूपातील महिलांचे सन्मानाने पूजन करून देवीचेच प्रतीक मानून त्यांना भेटवस्तू देणे अशा अनेक विविध पद्धतीने हे व्रत साजरे केले जाते. या व्रतासाठी श्रावणाच्या सुरुवातीलाच सुवासिनींनी लगबग सुरु असते. ओटीचे साहित्य, फळे, फुले, आरास करण्याचे साहित्य या साऱ्याची जमवाजमव करण्यासाठी महिलावर्ग आधीपासूनच तयारीत गुंतलेला दिसून येतो. हल्ली सोशल मीडियाच्या माध्यमातून आकर्षक आरास करण्याची पद्धत अनेक ठिकाणी वापरली जात असून यासाठी लागणाऱ्या साहित्याने बाजारपेठ फुलून गेली आहे.विविध प्रकारची फळे, फुले, पूजा साहित्यात गेल्या दोन चार दिवसात वाढ झाली आहे. फळांच्या दारात ३० ते ४० रुपयांची वाढ झाली आहे. तर फुलांमध्ये ५० ते ६० रुपयांची वाढ झाली आहे. कोविड परिस्थितीमुळे गेल्या दोन वर्षात हा सण छोट्या प्रमाणात साजरा करण्यात आला होता मात्र यंदा महिलावर्ग हा सण साजरा करण्यासाठी अत्यंत उत्साहात आहेत. बेळगावमधील अनेक देवी मंदिरांमध्ये आज विशेष आरास आणि पूजेचे आयोजन करण्यात आले होते. बेळगावमधील बसवाण गल्ली येथील श्री लक्ष्मी मंदिरात आज देवीला विशेष अशी आरास करण्यात आली होती.

यासंदर्भात आमच्या वाहिनीच्या प्रतिनिधींशी बोलताना देवस्थानाच्या पुजारी हेमा कम्मार यांनी श्रावण महिन्यातील शुक्रवारी केल्या जाणाऱ्या वरमहालक्ष्मीव्रताची माहिती दिली. देवस्थानात आजच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी होत असल्याचेहि त्यांनी सांगितले. ()

दरवर्षी हे व्रत श्रावण महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी केले जाते. मात्र यंदा पंचांगानुसार वरमहालक्ष्मी व्रताची तारीख १२ ऑगस्ट अशी देण्यात आली असून अनेक सुवासिनींनी नेहमीच्या प्रथेनुसार आज दुसरा शुक्रवार असल्याने हे व्रत अत्यंत भक्तिपूर्ण वातावरणात साजरे केले.

Tags: