बेळगावातील 58 प्रभागांमध्ये प्रभाग समिती स्थापन करण्याच्या मागणीचे निवेदन बेळगावातील सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी पुन्हा एकदा पालिका आयुक्तांना दिले.
बेळगाव महानगरपालिका कार्यालयात गुरुवारी आलेल्या सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि इतरांनी महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतली. बेंगळुरू आणि मंगळुरू महानगरपालिकेत प्रभाग समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. त्याचा धर्तीवर बेळगाव महानगरपालिका हद्दीतदेखील प्रभाग समित्या स्थापन कराव्यात या मागणीचे दुसरे निवेदन त्यांनी पालिका आयुक्तांना सादर केले. 
2016 मध्ये कर्नाटक सरकारच्या राजपत्रातील अधिसूचनेनुसार प्रत्येक प्रभागात एक प्रभाग समिती असावी. त्या समितीला त्यांनी पुरेसे अधिकार दिले आहेत. प्रत्येक प्रभागात 10 सदस्य असतात. 11 वा सदस्य नगर सेवक असतो. प्रभागातील पिण्याचे पाणी, रस्ता व इतर समस्यांबाबत दर महिन्याला बैठक घ्यावी, कोणत्या विकासकामांची गरज आहे, मिळालेल्या अनुदानाचा विनियोग कसा करायचा यावर चर्चा करून त्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांकडे सादर करावा. ही पारदर्शक व सर्वांचे भले करणारी प्रभाग समिती आहे. बंगळुरूमध्ये सुमारे 15 वर्षांपूर्वीपासूनच अस्तित्वात आहेत. मंगळूरमध्येही सहा महिन्यांत सहा बैठका झाल्या आहेत. हुबळीतही होत आहे. त्यामुळे आमच्या बेळगावातही प्रभाग समित्या स्थापन कराव्यात, अशी मागणी प्रभाग समितीचा प्रचार करणाऱ्या पी.एस.कुलकर्णी यांनी केली.
यावेळी एका सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले की, यापूर्वी आम्ही महापालिकेच्या आयुक्तांची भेट घेतली असता, आम्ही ही बाब गांभीर्याने घेऊ असे सांगितले आहे. म्हैसूर, बेंगळूर, मंगळूर, हुबळी पालिका हद्दींमध्ये अशा प्रभाग समित्या यापूर्वीच स्थापन केलेल्या आहेत. या समित्या पूर्णपणे महापालिका आयुक्तांच्या अखत्यारीत असतात. बेळगावातील सर्व 58 वॉर्डांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रभाग समिती स्थापन करण्याची आमची मागणी आहे.
अरविंद संगोळ्ळी, सुरेंद्र प्रकाश, श्वेता पाटील, प्रसाद तोरवी, डॉ. स्मिता कौजलगी, डॉ.अरविंद कुलकर्णी, सुधीर पद्मन्नावर, डॉ. मिलिंद हलगेकर, राजेश खटावकर आदी उपस्थित होते.


Recent Comments