Belagavi

सिद्धरामोत्सवाच्या माध्यमातून सिध्दरामय्यांनी निवृत्ती घ्यावी! डॉ. अश्वथनारायण यांची काँग्रेसवर टीका

Share

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा अमृतमहोस्तव साजरा होत असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी निवृत्ती घ्यावी, असा टोला लगावत काँग्रेसवर म्युझियमपूर्ती पर्यादित राहण्याची वेळ आली असून एकेकाळी काँग्रेस नावाचा पक्ष होता असे म्हणायची वेळ आली असल्याची टीका उच्च शिक्षणमंत्री डॉ. अश्वथनारायण यांनी केली आहे.

बेळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. यावेळी सिध्दरामय्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या. मात्र सिद्धरामोत्सव कार्यक्रमावर टीकाही केली. सिध्दरामय्यांनी कोणते योगदान दिले म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला आहे? असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला. ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर जनतेचा विश्वास संपादन करण्यात आता काहीच अर्थ नाही आता त्यांनी निवृत्तीची घोषणा करावी, असा टोलाही लगावला.

सिद्धरामोत्सवाचा भाजपवर काही परिणाम होणार आहे का? असा सवाल प्रसारमाध्यमांनी उपस्थित केल्यानंतर यावर प्रतिक्रिया देताना डॉ. अश्वथनारायण म्हणाले, काँग्रेस पक्षाचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. आगामी काळात काँग्रेस पक्ष एकेकाळी होता असे म्हणायची आणि काँग्रेस पक्ष संग्रहालयात पाहण्याची वेळ येऊन ठेपणार आहे असेही ते म्हणाले. आता काँग्रेस नेत्यांनी आपापसातील मतभेद संपवून शंभर टक्के निवृत्ती घेण्याची गरज असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

डॉ. अश्वथनारायण पुढे म्हणाले, के एल इ संस्थेसारख्या संस्था जास्त प्रमाणात वाढायला हव्यात शैक्षणिक गुणवत्ता वाढली कि संपूर्ण विश्वात आपण महान शक्ती म्हणून उदयास येऊ. प्रत्येक नागरिकाला उत्तम भविष्य मिळावे, यासाठी हा एक राजमार्ग असल्याचेही ते म्हणाले. डॉ. प्रभाकर कोरे यांना राज्यपालपद देण्याचा विचार हा योग्य असून डॉ. कोरे हे अनेक जागांसाठी उत्तम असल्याचेही ते म्हणाले.

डॉ. प्रभाकर कोरे यांचा अमृतमहोत्सव जरूर व्हावा. त्यांनी आजतागायत जनतेसाठी केलेले कार्य प्रत्येकापर्यंत पोहोचावे, यासाठी त्यांचा अमृतमहोत्सव साजरा व्हावा, अशी अशा व्यक्त करत त्यांनी डॉ. प्रभाकर कोरे यांना शुभेच्छा दिल्या.

तीन कृषी विद्यापीठांपैकी किमान एका विद्यापीठात महिलेची कुलगुरूपदी नियुक्ती व्हावी असा आग्रह होत आहे. याबाबत बोलताना डॉ. अश्वथ नारायण म्हणाले, सर्वांनाच समान संधी मिळायला हवी, महिलांना अधिक संधी मिळायला हवी. यामुळे उत्तम विकास साधता येऊ शकतो असे ते म्हणाले. व्हीटीयूच्या कुलगुरूंच्या कार्यकाळ संपत येत असून यासंदर्भात शोध समितीची स्थापना कारण्यासंदर्भातदेखील त्यांनी माहिती दिली.

बेळगावमधील के एल इ संस्थेच्या दीक्षांत समारंभात सहभागी होण्यासाठी आलेल्या डॉ. अश्वथ नारायण यांनी आज बेळगावमधील प्रसारमाध्यमांशी संवाद साधत अनेक विषयांवर प्रतिक्रिया दिली आहे.

Tags: