Belagavi

केएलई संस्थेचा १२वा ‘दीक्षांत समारंभ’ उत्साहात

Share

बेळगावमधील के एल इ संस्थेचा १२ वा दीक्षांत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभात उच्च शिक्षण मंत्री डॉ. के. अश्वथनारायण यांच्याहस्ते १५०२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.

के एल इ संस्थेच्या जेएनएमसी सेंटेनरी कन्व्हेन्शन हॉलमध्ये उच्च शिक्षणमंत्री डॉ. अश्वथनारायण यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.

यावेळी आयोजित कार्यक्रमात डॉ. अश्वथनारायण यांच्याहस्ते सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. या दीक्षांत समारंभात १४ पीएचडी, १० पोस्ट डॉक्टरेट, वैद्यकीय विभागातील ३७ विद्यार्थ्यांना सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले. आरोग्य विभागातील अशा एकूण १५०२ विद्यार्थ्यांना पदवीप्रदान करण्यात आली. यामध्ये ४९४ पदव्युत्तर, ९०९ पदवी, ११ पदव्युत्तर डिप्लोमा तर ३४ सर्टिफिकेट कोर्स, ८ फेलोशिप आणि २२ डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांचा समावेश होता.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना उद्देशून बोलताना डॉ. अश्वथनारायण म्हणाले, आज पदवी मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिभेचा वापर समाजातील गरीब लोकांच्या हितासाठी प्रामुख्याने करावा. महाविद्यालयीन आयुष्य संपल्यानंतर खऱ्या आयुष्याला सामोरे जाताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. अशावेळी गुरूंकडून मिळविलेल्या शिकवणीचे स्मरण करून उत्तम आयुष्य घडवा, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

ते पुढे म्हणाले, के एल इ संस्थेने समाजासाठी मोठे योगदान दिले आहे. केएलई ही संस्था केवळ एका क्षेत्रापुरती मर्यादित नसून डॉ. प्रभाकर कोरे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण, आरोग्य, समाजसेवेसह अनेक क्षेत्रात भरीव सेवा देत आहे. यंदा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘आझादीका अमृत महोत्सव’ साजरा होत आहे. या अंतर्गत प्रत्येकाने अभिमानाने, सन्मानाने आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवावा, असे आवाहन डॉ. अश्वथनारायण यांनी केले. या समारंभात कुलगुरू डॉ. विवेक सावजी यांनी केएलई विद्यापीठाचा अहवाल सादर केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के एल इ संस्थेचे कार्याध्यक्ष, कुलपती प्रभाकर कोरे हे होते. कुलपती डॉ.व्ही.ए.कोठीवाले, अध्यक्ष महांतेश कौजलगी, संचालक डॉ.व्ही.एस.साधुनवरा, एस.सी.मेटगुड, डॉ.विश्वनाथ पाटील, सचिव डॉ.बी.जी.देसाई, डॉ.व्ही.डी.पाटील, डॉ.एम.व्ही.जाली, डॉ.एन.एस.महंतशेट्टी, डॉ. अलका काळे इतर मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.

Tags: