बेळगाव जिल्हा क्रीडांगणावर खेळाचा सराव करणाऱ्या खेळाडूंकडून आकारण्यात येत असलेली फी रद्द करावी, या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या युवा शाखेतर्फे बेळगावात आज आंदोलन करण्यात आले.
युवा सबलीकरण आणि क्रीडा विभागाने 7 जुलै 2022 रोजी शासन आदेश क्रमांक 129 ईपीई 2022 नुसार शहरातील जिल्हा स्टेडियममधील खेळाडू आणि वॉकर्ससाठी त्यांनी निश्चित केलेल्या प्रवेश शुल्काबाबत आदेश जारी केला आहे. हे वाजवी नाही. जिल्हा स्टेडियममध्ये शुल्क आकारल्यास वसतिगृहात राहून खेळात प्रावीण्य मिळवणारे खेळाडू निराश होऊन खेळाकडे वळणार नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातून नवे खेळाडू निर्माण होणार नाहीत असा संताप आम आदमी पक्षाच्या युवा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना आपचे युवा नेते म्हणाले की, शहरातील अनेक लोक जिल्हा स्टेडियममध्ये फिरायला येतात. त्यासाठी फी आकारली, तर ते या स्टेडियममध्ये कसे येतील..? केंद्र सरकार स्वातंत्र्य दिनाचा एक भाग म्हणून ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करत आहे. अशा परिस्थितीत खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम युवा सबलीकरण व क्रीडा खात्याने केले पाहिजे. तसे न केल्यास आगामी काळात तीव्र संघर्ष छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी व क्रीडा खात्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. आंदोलनात सय्यद जुनैद पाशा, सौरव काळे, उस्मान खान, प्रशांत गोंधळी, मंजुनाथ कोप्पळ, अर्शद खान, अरविंद नायक, महावीर चौगले आदी उपस्थित होते.


Recent Comments