नागपंचमी अवघ्या एका दिवसांवर येऊन ठेपल्याने महिला वर्गाची लगबग सुरू झाली आहे. नागपंचमीसाठी लागणारे साहित्य आणि नागमूर्तीनी बाजारपेठा देखील सजल्या आहेत.
काही विक्रेते नागमूर्ती प्रत्येकी 50 ते 60 रुपये दराने विक्री करत आहेत. तर मोठ्या मूर्ती 80 ते 100 रुपये दराने बाजारपेठेत विक्रीकरिता दाखल झाल्या आहेत. नागपंचमी सणासाठी लागणाऱ्या विविध पूजा साहित्याचीही बाजारात खरेदीविक्री सुरु आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून बापट गल्ली, बेळगाव येथील मूर्तीकार शुभलक्ष्मी सुभाष जाधव या नागमूर्ती बनविण्याचे काम करत आहेत. यावर्षी त्यांनी सतराशे नागमूर्ती बनविल्या असून त्याची विक्री गोवा, गुलबर्गा, बिदर यासह कर्नाटकाच्या अनेक भागात जोरात सुरु आहे. शुभलक्ष्मी सुभाष जाधव या गेल्या अनेक वर्षांपासून एकट्या नागमूर्ती तयार करतात. त्यांचा उदरनिर्वाह देखील याच व्यवसायावर अवलंबून असल्याने या महागाईच्या काळात देखील त्या नागमूर्ती माफक किमतीत विकत आहेत. नागमूर्ती साच्यात घालण्यापासून ते त्यांना रंग देण्याचे काम देखील त्या एकट्या करतात. अठरा रुपयापासून ते 26 रुपयांपर्यंत ते नागमूर्तीची होलसेल दराने विक्री करत आहेत. त्याशिवाय गोकुळाष्टमी दिवशी लागणाऱ्या श्रीकृष्णाच्या मूर्ती, हरतालिकेच्या मूर्ती, शंकराची मूर्ती, उंदीर यासह अनेक मूर्ती त्या गेल्या अनेक वर्षांपासून बनवत आहेत. त्यांचा हा व्यवसाय गेल्या तीन पिढ्यांपासून सुरु आहे.

दरम्यान, नागपंचमी सणासाठी बेळगाव बाजारपेठेत ग्राहकांची विशेषतः महिलांची गर्दी दिसून येत आहे. सणासाठी हळदीची पाने, अळू, भोपळ्याची पाने, लाह्या, तंबिट, हराटी, नागपुडी, गजवस्त्र तसेच अन्य पूजा साहित्याची खरेदीविक्री जोरात सुरु आहे.

चुरमुरे, पोह्याच्या भट्ट्यात चुरमुरे, विविध प्रकारचे पोहे, लाह्या, लाडू आदी फराळाच्या साहित्याची खरेदीविक्री सुरु आहे.


Recent Comments