Belagavi

कणगला बॉटलिंग प्लांटमध्ये एलपीजी स्फोटाचे मॉक ड्रील

Share

बेळगाव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणतर्फे हुक्केरी तालुक्यातील कणगला येथील भारतीय बॉटलिंग प्लांट कारखान्यात एलपीजी स्फोटाचे मॉक ड्रील प्रात्यक्षिक घेण्यात आले.

जिल्ह्य़ातील हा सर्वात धोकादायक कारखाना असून, यात एलपीजीचा साठा केला जातो. त्यामुळे संभाव्य दुर्घटना झाल्यास ती तातडीने कशी आटोक्यात आणून त्याचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून तत्काळ उपाययोजना करण्यासाठी हे प्रात्यक्षिक घेण्यात आले.कारखान्याच्या आत एलपीजीचा स्फोट झाला आणि या घटनेत कणगला गावातील रहिवासी जखमी झाले असे समजून, त्यांना तातडीने बाहेर काढून वैद्यकीय उपचार मिळावेत, अशा परिस्थितीचे प्रात्यक्षिक करून कारखान्यातील एलपीजी साठा सुरक्षित करण्यात आला. अशा परिस्थितीत कणगला गावातून सुमारे 87 जणांची सुटका करून संकेश्वर येथील शंकरलिंग कल्याण मंडपात उभारलेल्या मदत केंद्रात हलवण्यात आले. तसेच तालुका आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे पुढील उपचारासाठी संकेश्वर कम्युनिटी सेंटर येथे आणण्यात यश मिळविले.

अपघाताची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने तत्काळ धाव घेतली आणि अपघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीने कारवाई करण्याच्या सूचना अपघातस्थळी संबंधित सर्व विभागांना दिल्या.त्यानुसार होन्निहळ्ळी सर्कल येथे घटना कमांड पोस्ट उभारण्यात आली व तेथून सर्व साधनसामुग्री जमवून घटना नियंत्रण, लोक व गुरे यांची सुटका, जखमींना वाचवणे ही कामे अत्यंत यशस्वीपणे पार पडली. 5 रुग्णवाहिका, 2 अग्निशमन दल, 1 बचाव वाहन, एसडीआरएफचे 13 कर्मचारी, 25 अग्निशमन कर्मचारी, 25 पोलीस, 35 होमगार्ड कर्मचारी, 35 आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि इतर अधिकारी या मॉक प्रात्यक्षिकात सहभागी झाले होते. प्रांताधिकारी रवींद्र करलिंगणावर, कारखाना उपसंचालक व्यंकटेश राठोड यांच्या नेतृत्वाखाली व खालील अधिकाऱ्यांच्या सहकार्याने हे मॉक प्रात्यक्षिक घेण्यात आले. बेळगाव जिल्हा अग्निशमन अधिकारी शशीधर एस निलगार, एसडीआरएफचे उपकमांडर अरविंद, हुक्केरी तहसीलदार डॉ. हुगार, हुक्केरी तालुका आरोग्याधिकारी डॉ. कुडची, चिक्कोडी प्रादेशिक परिवहन अधिकारी विशाल, पर्यावरण अधिकारी रमेश, संकेश्वरचे पीएसआय गणपती कोगनोळी, एनडीआरएफचे संजीवकुमार, आयओसीएलचे सुरक्षा अधिकारी हर्षल परहाते, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विशेषज्ञ निंगनगौडा आणि चन्नबसन गौडा उपस्थित होते.

Tags: