Belagavi

एमके हुबळी साखर कारखान्यातील घोटाळ्याबाबत भव्य सभा : सिध्दगौड मोदगी

Share

एम के हुबळी येथील मलप्रभा साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि संचालकांनी केलेला गैरव्यवहार आणि अधिकाराचा दुरुपयोग, यासंदर्भात चर्चा करण्यासाठी ५ ऑगस्ट रोजी इटगी क्रॉस येथील वीरभद्रेश्वर देवस्थानात कारखान्याचे सदस्य तसेच शेतकऱ्यांची सभा बोलाविण्यात आली आहे, या सभेस सर्व भागधारक आणि शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असं आवाहन भारतीय कृषी समाजाचे अध्यक्ष सिध्दगौड मोदगी यांनी केलंय.

बेळगावमधील कन्नड साहित्य भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मलप्रभा साखर कारखाना हा दक्षिण भारतातील शेतकऱ्यांसाठी संजीवनी आहे. परंतु कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी पदाचा दुरुपयोग करत गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप आहे. यासंदर्भात चर्चा होणे गरजेचे आहे. डिसेंबर महिन्यात कारखान्यात १८ हजार क्विंटल साखर जप्त करण्यात आली असून, संबंधित सर्व अधिकाऱ्यांना चौकशीचे आवाहन केले आहे. मात्र सरकारने याबाबत कार्यवाही केलेली नाही. सर्व शेतकरी संघटनांनी एकत्र येत अधिकाराचा दुरुपयोग व कारखान्यातील गंभीर त्रुटींबाबत माननीय आयुक्तांकडे दाद मागितली. या संदर्भात माननीय आयुक्तांनी डिसेंबरमध्ये फेरविचार करण्याचे आदेश दिले होते. या सर्व मुद्द्यांवरही चर्चा झाली पाहिजे.यासाठी या सभेला उपस्थितांची उपस्थिती अनिवार्य असून शेतकऱ्यांच्या बाजूने कसे लढायचे याचा विचार करायला हवा, असे सिध्दगौडा मोदगी म्हणाले.()

यानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उसाच्या एफआरपीसंदर्भात चर्चा केली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आदेशानुसार प्रति टन ३०५० रुपये एफआरपी देण्यात यावा, यासंदर्भात चर्चा झाली. कारखान्यांमधून एफआरपीपेक्षा कमी दर देण्यात येत आहे. यासंदर्भात ५ ऑगस्ट रोजीच्या सभेत शेतकऱ्यांनी मुद्दा मांडावा, विकासाच्या दृष्टीकोनातून या भागातील कारखान्याचे सदस्य आणि शेतकऱ्यांनी सभेत सहभाग घ्यावा, शेतकऱ्यांच्या समस्यांसंदर्भात चर्चा करून उत्तम व्यासपीठ मिळावे, ज्यामुळे कायदेशीर लढा देऊन न्याय मागता येईल. ()

यावेळी जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांचे नेते आणि शेतकरी उपस्थित होते.

Tags: