मंगळुरू येथील भाजप कार्यकर्ता प्रवीणच्या हत्येप्रकरणी सरकार काहीच करत नाही असे म्हणणे चुकीचे असून, या घटनेचा मी निषेध करतो. मी मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना याबाबत विनंती करेन. भारतीय राज्यघटना न मानणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी केली आहे.
आ. अभय पाटील यांनी गुरुवारी बेळगावात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, ही अशाप्रकारची दुसरी घटना आहे. म्हणून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. विशेष न्यायालय चालवून आरोपीना त्वरित शिक्षा जाहीर करावी. अशा कृत्यांत गुंतलेल्यांचा एन्काऊंटर केला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
मी गेली 32 वर्षांपासून भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. पण एवढा आक्रोश कधी व्यक्त झाल्याचे पाहिले नाही. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे हे सत्य आहे. कार्यकर्ते पक्षासाठी खूप मेहनत घेतात. त्यांची, त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी पक्षावर आहे. मुख्यमंत्र्यांनी हा कार्यक्रम रद्द करून कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्याचा दावा आ. अभय पाटील यांनी केला.
प्रवीणच्या मारेकऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी ही माझी वैयक्तिक मागणी आहे. दोषींवर कठोर कारवाई झाल्यास अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. अनेक लोक एसडीपीआय, पीएफआयवर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. त्यामुळे कोणाची मर्जी राखण्याचा प्रश्नच येत नाही. कठोर कारवाई झाली तर अशी कोणतीही उपद्रवी संस्था टिकणार नाही. गरज पडल्यास निश्चितपणे एन्काऊंटर करावे, अशी मागणी आ. अभय पाटील यांनी केली.
एकंदर, प्रवीणच्या हत्येनंतर राज्यातील भाजपच्या विविध पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊ केले आहेत. या संदर्भात त्या पदाधिकाऱ्यांची समजूत भाजप कशी काढणार हे पाहावे लागेल.


Recent Comments