ग्रामीण भागातील गरीब नागरिकांना ज्या प्रकारे ग्राम पंचायतीकडून रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगार देण्यात येतो, त्याप्रमाणे शहरी भागातील गरीब महिला आणि पुरुषांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी आज खानापूर शहरातील शेकडो बेरोजगार महिलांनी तहसील कचेरीवर मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले.

खानापूर शहरातील शेकडो बेरोजगार महिलांनी तहसील कचेरीवर मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले. मोलमजुरी करणाऱ्या महिला आपली शेतीची अवजारे फावडा, बुट्ट्या, पिकास, कुदळ, खुरपी घेऊन या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. 
निवेदनाचा स्वीकारून बोलताना तहसीलदार प्रवीण जैन म्हणाले की, ग्रामीण भागातील लोकांप्रमाणे शहरातील लोकांनाही रोजगार उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे निवेदन मला देण्यात आले आहे. यात मी जातिनिशी लक्ष घालून वरिष्ठांना हे निवेदन पाठवून देऊन पाठपुरावा करेन असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. 
सदर मोर्चाचे नियोजन निधर्मी जनता दलचे राज्य कार्यकारिणी सदस्य रेवणसिद्धय्या हिरेमठ, रवी काडगी आणि वकील संघटनेचे अध्यक्ष ईश्वर घाडी यांनी केले होते. यावेळी नगरपंचायत मुख्याधिकारी बाबासाहेब माने, वकील एस. के. नंदगडी, सामाजिक कार्यकर्त्या प्रिया परशराम पाटील, रेखा गुरव यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या.


Recent Comments