Bailahongala

आम. दोड्डगौडर आणि कौजलगी यांनी काढली अधिकाऱ्यांची खरडपट्टी

Share

ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वतीने जिल्हा पंचायत, तालुका पंचायत, केडीपी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैलहोंगल येथील तालुका पंचायत सभागृहात झालेल्या बैठकीत अपूर्ण माहिती आणणाऱ्या व माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कृतीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत आमदार महांतेश दोड्डगौडर आणि आमदार महांतेश कौजलगी यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली.

सरकारी योजनांची योग्यरितीने अंमलबजावणी न होणे, युरिया, खत मिळत नसल्याच्या तक्रारी, नुकसानग्रस्त घरांना न मिळणारी भरपाई, वीज समस्या यासह अनेक समस्यांबद्दल नागरिक तक्रारी करत आहेत. याकडे अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत असून अशा अधिकाऱ्यांवर आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

सहायक कृषी संचालक दळवाई यांना यासंदर्भात कृषी विभागाकडून कोणती पावले उचलली जात आहेत, असे विचारले असता उत्तर देण्यास टाळाटाळ केली. खताचा तुटवडा नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे आमदारांनी खत पुरवठ्याचा तपशील मागितला. याबाबत योग्य माहिती न दिल्याने त्यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. तसेच शेतकऱ्यांना तातडीने खतपुरवठा करण्यासाठी सूचना त्यांनी दिली.तहसीलदार, ईओ, पीडीओ, तलाटी यांनी स्वतः भेट देऊन कित्तूर, बैलहोंगल परिसरातील नुकसानग्रस्त घरांची पाहणी करून लाभार्थ्यांना तात्काळ भरपाई देण्यात यावी, निष्पक्षपणे आणि प्रामाणिकपणे काम करावे, जेणेकरून कुणावरही अन्याय होणार नाही अशा सूचनाही आमदारांनी केल्या.

यावेळी विजसमस्येसंदर्भात असलेल्या नागरिकांच्या तक्रारींसंदर्भात देखील आमदारांनी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले. यासंदर्भातील माहिती देखील पुरविण्यात यावी, टीसी हस्तांतर करण्यात यावा, याबाबत कोणतीही टाळाटाळ न करता काम झाले पाहिजे, अशा शब्दात त्यांनी हेस्कॉम अधिकाऱ्यांना फटकारले.

यावेळी महसूल, कृषी, फलोत्पादन, शिक्षण, हेस्कॉम, पाटबंधारे यासह विविध विभागांच्या प्रगतीचा आढावा घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. या बैठकीला तहसीलदार बसवराज नागराळ, ईओ सुभाष संपगाव, आणि तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

Tags: