Belagavi

कारगिल युद्धात देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकात बेळगावचाही जवान!

Share

६५ दिवसांहून अधिक काळ सुरु असलेल्या कारगिल युद्धाची आठवण आजही तितकीच ताजी आहे. अंगावर रोमांच उभे करणारी हि लढाई आजतागायत अनेक सैनिकांच्या, शहीद सैनिकांच्या कुटुंबियांच्या मनात घर करून आहे. कारगिल युद्धात देशासाठी आपल्या प्राणाचा त्याग देणाऱ्या वीर सैनिकांपैकी बेळगावमधील एक सैनिक देखील आहे. कारगिल युद्धात धारातीर्थी पडलेल्या शहीद भारत मस्के आणि त्यांच्या कुटुंबियांसमवेत इन न्यूजने साधलेला संवाद पाहुयात या पुढील रिपोर्टमधून…

भारतीय सैन्यदलात तीन पिढ्यांपासून कार्यरत असणारे बेळगावमधील मस्के कुटुंबीय. देशभक्ती हा भारत मस्के कुटुंबाचा श्वास आहे. नारायण मस्के, त्यांचा मुलगा बबन मस्के आणि नातू भारत आणि प्रवीण मस्के अशा तीन पिढ्यांनी भारतीय सैन्यदलात सेवा बजाविली आहे. यातील भारत मस्के यांनी कारगिल युद्धात वीरमरण पत्करले तर प्रवीण मस्के यांनी ४ वर्षे सैन्यदलात सेवा बजाविली. प्रवीण मस्के यांची प्रकृती बिघडल्याने त्यांचेही निधन झाले. आपली दोन्ही मुले हि देशसेवेत अग्रेसर राहिली याचा मस्के दाम्पत्याला अभिमान आहे.बेळगावमधील शाहू नगर येथे नातवंडे, सुना आणि पत्नीसमवेत राहणाऱ्या बबन मस्के यांनाही भारतीय सैन्यदलात सेवा बजाविली आहे. भारत मस्के यांनी १० वर्षे सैन्यदलात सेवा बजावून कारगिल युद्धात जम्मू येथे झालेल्या लढाईत वीरमरण पत्करले. १९८९ साली सैन्यदलात भरती झालेल्या भारत मस्के यांनी १९९९ मध्ये जम्मूतील पुंजा येथील कारगिल युद्धात उत्साहाने भाग घेतला. या दरम्यान झालेल्या युद्धात पाकिस्तानी सैनिकांनी डागलेल्या ५ गोळ्या त्यांच्या डोक्याला लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. आपली दोन्ही मुले गेल्याच दुःख पद्मावती मस्के यांना आहे परंतु दोन्ही मुलांनी देशसेवा केली याचा अभिमान देखील आपल्याला असल्याचे त्या सांगतात. २७ वर्षीय पतीचे निधन झाल्यानंतर आपल्या मुलांना तितक्याच ताकदीने त्यांची पत्नी लक्ष्मी मस्के यांनी वाढविले. एका मुलीने बीकॉम तर आणखी एका मुलाने एमबीए शिक्षण पूर्ण केले आहे. पतीच्या निधनानंर दोन्ही मुलांना उत्तम शिक्षण देऊन वडिलांप्रमाणे मुलानेही देशसेवा करावी, अशी शहीद पत्नी लक्ष्मी मस्के यांची इच्छा आहे. सैन्यभरतीसाठी प्रयत्न करण्यात आले असून काही कारणास्तव आपल्या मुलाची सैन्यदलात भरती होऊ शकली नाही मात्र पेट्रोल बंक साठी मुलाने अर्ज केला असल्याची माहिती लक्ष्मी मस्के यांनी दिली. घरातील कर्ते पुरुष देशसेवेत शहीद झाले. सध्या आपल्याला उदरनिर्वाहासाठी सरकारी नोकरी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी लक्ष्मी मस्के यांनी केली आहे. आपल्या पतीने देशसेवेसाठी बलिदान दिले याचा आपल्याला अभिमान आहे. धारवाड येथे शहीद सैनिकांचे स्मारक आहे आपल्या पतीचेही स्मारक तिथे आहे. प्रत्येक वर्षी आपण तिथे जातो. सरकारतर्फेही शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते. भारतीय सैन्यामुळे देश सुरक्षित असून युवकांनी सैन्यदलात भरती होण्यासाठी पुढाकार घ्यावा., असे आवाहनदेखील त्यांनी केले आहे.

देशाच्या सीमेवर असंख्य सैनिक आपल्या प्राणाची पर्वा न करता देशसेवेत गुंतले आहेत. आजतागायत अनेक सैनिकांना वीरमरण प्राप्त झाले आहे. यापैकीच एक आपल्या बेळगावमधील मस्के कुटुंबीय. तीन पिढ्यांपासून देशसेवेत असणाऱ्या मस्के कुटुंबातील भारत मस्के हे कारगिल युद्धात शहीद झाले. भारत मस्के आणि अशा अनेक वीर योध्यांना कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने इन न्यूज नेट्वर्कच्यावतीने सलाम!

Tags: