बेड जंगम समाजाचे बनावट जाती प्रमाणपत्र देणाऱ्या आणि घेणाऱ्यांविरोधात चिकोडी तालुक्यातील विविध दलित संघटनांच्यावतीने २९ जुलै रोजी आंदोलन छेडण्यात येणार आहे. २९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता भव्य निषेध मोर्चा काढून चिकोडी उपविभागाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना निवेदन देण्यात येणार आहे. सदर मिरवणुकीत तालुक्यातील सुमारे १ हजारहून अधिक जनता सहभागी होणार असल्याची माहिती दलित नेते रावसाब फकीर यांनी दिली.

चिकोडी येथील गेस्ट हौस मध्ये आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हि माहिती दिली आहे.निषेध मोर्चात हरळय्या मंदिर ते मिनीविधानसौध पर्यंतचा मार्ग समाविष्ट आहे. राज्यात बेड जंगम समाजाच्या नवे काही अधिकारी बनावट कागदपत्रे पुरवत आहेत. या माध्यमातून अनेकांनी बनावट जाती प्रमाणपत्र मिळविली आहेत. या बनावट जाती प्रमाणपत्राचा दुरुपयोग होत असल्याचे आढळून आले आहे. शिवाय इतर बेड जंगम समाजावर अन्याय होत आहे. गेल्या ५० वर्षांपासून उच्च समाजातील काही लोकांनी बेड जंगम समाजात आरक्षण मिळविले आहे, असा दावा त्यांनी केलाय. अनुसूचित समाजासाठी असणाऱ्या सुविधा हिरावून घेण्याचा हा प्रकार असून यामुळे अनुसूचित जातीतील जनतेला फटका बसत असल्याचे ते म्हणाले.
यावेळी अशोक भांडारकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, १९८१ च्या जनगणनेनुसार राज्यात ३३५०० जण बेड जंगम समाजात होते. मात्र राजकीय हेतू आणि काही अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे बनावट जात प्रमाणपत्रे घेऊन बेड जंगम समाजाव्यतिरिक्त अनेक लोक या समाजात समाविष्ट झाले आहेत. अशा अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा राज्यव्यापी उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. राज्यात अनुसूचित जाती जमातीचे विविध राजकीय पक्षातील ३६ हुन अधिक आमदार आहेत. या आमदारांनी सभागृहात यासंदर्भात आवाज उठवावा, असे आवाहन देखील भांडारकर यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेला सुदर्शन तम्मण्णावर, सुरेश बायकोड, नंदकुमार दरबार, निरंजन कांबळे, महादेव मन्नोळकर, आनंद अरबळ्ळी, अण्णाप्पा घट्टी, राघवेंद्र सनदी, अर्जुन माने, अप्पासाब तडाखे, विजय मोटनांवर, जीवन मांजरेकर आदी उपस्थित होते.


Recent Comments