विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणापासूनच आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, याचा निश्चय करून विविध प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षेला सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे असे आवाहन भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एन. मिसाळे यांनी केले.

खानापूर तालुक्यातील हलशीवाडी येथील सरकारी मराठी शाळेमध्ये महेश फौंडेशन व वेदांत फौंडेशन यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रारंभी डॉ. मिसाळे, वेदांत फौंडेशनचे अध्यक्ष सतीश पाटिल, सचिव एन. डी. मादार, शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष विनोद देसाई, मिलिंद देसाई, नवहिंद सोसायटी नंदगड शाखेचे व्यवस्थापक रघुनाथ देसाई त्यांच्या हस्ते सरस्वती फोटो पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले.

यावेळी वेदांत फाउंडेशनचे कार्याध्यक्ष व प्राचार्य डी. एन. मिसाळे म्हणाले, सरकारी शाळेमध्ये शिक्षण घेऊन आज अनेक जण पुढे आले आहेत. त्यामुळे शिक्षकानी विद्यार्थ्यांना गुणात्मक शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मोरारजी देसाई निवासी शाळेसह विविध प्रकारच्या सैनिक शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या पाहिजेत. तसेच आपण शिक्षण घेऊन पुढे कोणत्या क्षेत्रात करिअर करणार आहोत याबाबतचा विचार देखील केला पाहिजे असे मत व्यक्त केले.
गुंडपी येथील सरकारी मराठी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय देसाई यांनी प्रास्ताविक केले.
मुख्याध्यापक के एस जाधव यांनी शाळेची माहिती दिली. हलशी कृषी पत्तिन सोसायटीचे संचालक अनंत देसाई, राजन सुतार यांनी स्वागत केले. यावेळी सतीश पाटील, एन डी मादार, मिलिंद देसाई आदिनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी अनिल देसाई, लक्ष्मण देसाई, मल्लाप्पा देसाई, लव देसाई सहशिक्षिका बेनिता यांच्यासह गावातील पालक व विद्यार्थी उपस्थित होते.


Recent Comments