बेळगाव शहर, परिसरासह अनेक भागात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. गेल्या काही महिन्यांत शहर-परिसरातील अनेक नागरिक विशेषतः लहान मुलांवर कुत्र्यांनी हल्ला करून चावे घेतले आहेत. त्यामुळे त्यांचा उपद्रव नियंत्रणात आणण्यासाठी बेळगाव महानगरपालिकेने ‘ऑपरेशन डॉग’ हि मोहीम आखली आहे.
अनेक ठिकाणी कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांच्या संख्येत वाढ झाली असून रात्रीच्या वेळी शुकशुकाट असलेल्या रस्त्यांवरून कुत्र्यांचीच अधिक दहशत होती. या साऱ्यावर नियंत्रण ठेवण्याच्या कडक सूचना आ. अभय पाटील यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिल्या असून मनपा कर्मचाऱ्यांनी शहरातील भटकी कुत्री पकडण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या ६ माहियात १४२७८ नागरिकांचा चावा भटक्या कुत्र्यांनी घेतला असल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. गेल्या वर्षी हि संख्या १३६० इतकी होती. मागील वर्षी कोविड मुळे नागरिकांची वर्दळ तशी कमी होती. या दरम्यान रस्त्यावर भटक्या कुत्र्यांची संख्या अधिक निदर्शनात आली असून केवळ शहरच नाही तर ग्रामीण भागात देखील कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले आहे. अनेक दिवसानापासून भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासंदर्भात नागरिकांच्या मागण्या होत होत्या.
सध्या आ. अभय पाटील यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनेनुसार शहर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मोहीम आखली गेली आहे. या मोहिमे अंतर्गत कुत्र्यांची नसबंदी मोहीम देखील हाती घेण्यात येणार आहे.
यासंदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती देताना आ. अभय पाटील म्हणाले, बेळगावमध्ये भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मोहीम सुरु झाली असून कडक सूचना दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी हि मोहीम सुरु केली आहे. एका गल्लीतून कुत्री पकडून दुसऱ्या गल्लीत सोडणे हा प्रकार होऊ नये, ज्याठिकाणी कुत्र्यांची आहाराची व्यवस्था होईल, त्या ठिकाणी कुत्री सोडण्यात यावीत, अशी सूचनाही देण्यात आली आहे. बेळगाव शहरात १ हजार हुन अधिक गल्ल्या आहेत. कुत्रा चावल्यानंतर लागणारे औषध देखील सर्व सरकारी रुग्णालयात उपलब्ध आहे. औषधांची कमतरता जाणवल्यास अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येईल, असे आ. अभय पाटील यांनी सांगितले.
कुत्रा चावल्यानंतर लागणाऱ्या औषधांसंदर्भात जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. महेश कोणी यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले, बेळगाव जिल्ह्यात ६ महिन्यात १४२७८ इतकी प्रकरणे पुढे आली आहेत. गेल्या वर्षी याच अवधीत १३६० प्रकरणे दाखल झाली होती. कोविडमुळे नागरिकांची वर्दळ मागील वर्षी कमी होती. आता नागरिकांची वर्दळ वाढली असून यादरम्यान कुत्रा चावण्याच्या घटना अधिक वाढल्या आहेत. यासंदर्भात आपल्या विभागाच्या सर्व सभेत चर्चा झाली आहे. नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांसमवेत देखील यासंदर्भात बैठक झाली असून आरोग्य विभागासह पशुसंगोपन विभाग आणि इतर विभागांनी एकत्र येऊन काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी नसबंदी मोहीम देखील आखण्याची गरज आहे. ग्राम पंचायत स्तरावर पशुवैद्यांकडून शस्त्रक्रिया करण्यात आली पाहिजे. जिल्ह्यात अँटी रेबीज लसीची कोणतीही कमतरता नाही. कुत्रा चावणे आणि कुत्र्याचा स्पर्श होणे या दोन्ही गोष्टी वेगळ्या असल्याचेही आरोग्याधिकाऱ्यांनी सांगितले.
आमदार अभय पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर बेळगावमधील नागरिकांना भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवापासून काहीशी मुक्तता मिळणार आहे. भटक्या कुत्यांना पकडून त्यांना सुरक्षित स्थळी सोडणे यासह त्यांच्या नसबंदी शास्त्रक्रियेसंदर्भात देखील पाऊल उचलणे महत्वाचे आहे.


Recent Comments