बेळगाव येथील अंजनेय नगर येथील मागासवर्गीय वसतिगृह आझम नगर वसतिगृहात हस्तांतरित करण्यात येत असून याविरोधार्थ आज विद्यार्थी बंधुत्व वेदिका, कर्नाटकच्या वतीने निषेध व्यक्त करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
अंजनेय नगर, बेळगाव येथील मागासवर्गीय कल्याण विभागाचे वसतिगृह विद्यार्थ्यांसाठी अतिशय सोयीचे होते. मात्र नुकतेच ते आझम नगर येथील वसतिगृहात स्थलांतरित करण्यात आले आहे. आझम नगर येथील वसतिगृहात आधीच शेकडो विद्यार्थी आहेत. येथे मूलभूत सुविधांचाही अभाव आहे. वसतिगृह येथे स्थलांतरित केल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवरदेखील परिणाम होईल. शिवाय काही विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे अंतर देखील वाढेल. यामुळे अंजनेय नगर येथील वस्तीगृहातच आपल्याला राहायला द्यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे.
यावेळी आपली मराठीशी बोलताना विद्यार्थी म्हणाले, अंजनेय नगरमध्ये असलेले आपले वसतिगृह आझम नगर येथे वर्ग करण्यात आले आहे. आधीच आझम नगर वसतिगृहात १२० विद्यार्थी आहेत. त्याठिकाणी आपल्याला वस्तू ठेवण्यासाठीही जागा पुरेशी नाही. जेवण आणि राहण्याची सोयदेखील व्यवस्थित नाही. काही विद्यार्थ्यांनी अंजनेय नगर येथील वस्तीगृहापर्यंत बसपास काढला आहे. अचानक केलेल्या स्थलांतरामुळे विद्यार्थ्यांना आता उरलेल्या काही कालावधीसाठी पुन्हा नव्या मार्गासाठी बसपास काढावा लागेल, यात गरीब विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होईल, यामुळे हे स्थलांतर रोखण्यासाठी आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती केली असल्याचे विद्यार्थ्यानि सांगितले.
यावेळी दलित नेते मल्लेश चौगुले प्रतिक्रिया देताना म्हणाले, अनेक विद्यार्थी आपल्या घरापासून दूर याठिकाणी शिक्षणासाठी येतात. बेळगावमध्ये नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे येथील परिस्थितीची कल्पना त्यांना नाही. याठिकाणी अनेक गरीब विद्यार्थीही येतात. त्यांच्या मदतीसाठी कोणीही येथे येत नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन यावर तोडगा काढावा, अन्यथा दलित संघटना यासाठी आंदोलन छेडतील, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी अनेक दलित नेते तसेच विद्यार्थी उपस्थित होते.


Recent Comments