नंदगड–बिडी मार्गावरील कुनकीकोप्प गावाजवळील रस्त्यावर उभा असलेला हा जीर्ण वृक्ष कधी कोसळेल याचा नेम नाही. वनखात्याच्या निष्काळजीपणामुळे हा धोकादायक वृक्ष मोठ्या संभाव्य दुर्घटनेचे कारण ठरू शकतो.

होय, “ऊन-वाऱ्याने, पावसाने माझी शक्ती संपलीय, मी गलितगात्र झालोय. कधी कोसळेन, उन्मळून पडेन मलाच माहित नाही. मला हटविण्याचे काम वन खात्याचे आहे. मात्र वन अधिकारी माझ्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
त्यामुळे मी कधी कोसळलो, त्यामुळे कोणाला इजा झाली तर त्याला मी नव्हे तर वन खातेच जबाबदार असेल” असेच जणू हा भला मोठा निष्पर्ण वृक्ष आपली गाथा सांगतोय. पण निर्ढावलेल्या वन खात्याला त्याचे काय? वन खात्याचे अधिकारी आपले कर्तव्य पार पाडण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे येथून जाणाऱ्या प्रवाशांच्या जीवाला धोका उदभवला आहे. खानापूर वन खात्याच्या हद्दीतील नंदगड उप वन क्षेत्राचे अधिकारी हा वृक्ष हटविण्याकडे दुर्लक्ष करत आहेत.
भुरुणकी ग्राम पंचायतीचे सदस्य एम. एम. साहुकार यांनी या धोकादायक वृक्षाचे दृश्य टिपले आहे. या वृक्षामुळे आपल्या कारला धोका पोहोचू शकला असता अशी तक्रार वन खात्याकडे त्यांनी देऊनही अधिकाऱ्यांनी त्याकडे डोळेझाक केली आहे.


Recent Comments