Vijayapura

भीमातीरावरील कायदा आणि सुव्यवस्थेसाठी एडीजीपींचा नवा ‘प्लॅन’!

Share

एडीजीपी आलोक कुमार यांच्या माध्यमातून भीमातीरावरील परिसरात कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी शांतता मंत्राचा वापर करण्यात येत आहे. येथील महादेव साहुकार बैरगोंड आणि मल्लिकार्जुन चडचण यांच्या कुटुंबात गेल्या अनेक दशकांपासून सुरु असलेली द्वेषाची आग विझविण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत दोन्ही गटांना चडचण पोलीस स्थानकात बोलावून समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे.

खाकी फायर ब्रँड’ एडीजीपी आलोक कुमार हे दोन दिवस विजापूर दौऱ्यावर आहेत. यादरम्यान भीमा तीरावरील परिसरात भेट दिली. आलोक कुमार यांनी अलमेल पोलीस स्थानकाला भेट देऊन नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या. त्यानंतर भीमा तीरावरील चडचण पोलीस स्थानकाला भेट देऊन तेथील नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. या भागात पोलिसांविरोधात नागरिकांनी काही तक्रारी केल्या असून चडचण पोलीस स्थानकातील सीपीआय आणि पीएसआय महिलांशी असभ्य वर्तन करत असल्याचा आरोप नागरिकांनी केल्याचे एडीजीपींनी सांगितले.

जाहीर सभेनंतर भीमातीरावरील दोन्ही कुटुंबियांना बोलावून त्यांच्यात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. महादेव साहुकार बैरगोंड आणि मल्लिकार्जुन चडचण या दोन कुटुंबांमध्ये असलेल्या संघर्षामुळे या भागातील कायदा आणि सुव्यवस्था विस्कटली आहे. दोन्ही कुटुंबांमध्ये असलेल्या द्वेष निवळण्यासाठी विशेष बैठक घेण्यात आली. दोन्ही कुटुंबांमध्ये असलेल्या द्वेषामुळे गावातील शेकडो प्रकरणे पोलिसात दाखल झाली आहेत. त्यामुळे दोन्ही कुटुंबीयांनी गावच्या शांततेसाठी सहकार्य करावे, शिवाय मल्लिकाजी चडचण आणि विमलाबाई यांनी पोलीस विभागासमोर शरणागती घ्यावी असा इशाराही एडीजीपींनी यावेळी दिलाय.

जुने वाद विसरून सलोखा निर्माण करण्यासाठी दोन्ही कुटुंबीयांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलीस विभागाला सहकार्य करावे, असेही एडीजीपींनी सांगितले. २०१८ साली भीमातीरावरील उमराणी येथे झालेल्या शांतता सभेत विमलाबाई यांना पतीसह पोलीस विभागासमोर शरणागती घेण्यासाठी सांगितले होते. धर्मराज चडचण आणि गंगाधर यांच्या हत्येप्रकरणी महादेव बैरगोंड यांना अटक करून न्याय देण्यात आला होता. परंतु पुन्हा चडचण कुटुंबीय महादेव बैरगोंडा यांच्यावर गोळीबार करत असल्याबाबत एडीजीपींनी नाराजी व्यक्त केली.

यापुढील काळात अशा पद्धतीने नाट्यमयरित्या खेळ खेळ्यास पोलीस विभाग खपवून घेणार नाही. मालिकार्जून चडचण हे फरारी असून त्यांना तातडीने पोलीस विभागासमोर शरणागती पत्करण्यास सांगावे, या दोन्ही कुटुंबियांच्या वादात ग्रामस्थांनी मध्यस्थी करू नये, रात्रीच्यावेळी घराबाहेर पडू नये अशी सक्त ताकीद यावेळी एडीजीपींनी दिली.

कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून भीमा नदीतीरावर एडीजीपींनी एक नवे पाऊल पुढे टाकले आहे. या भागात असलेल्या चडचण आणि बैरगोंडा कुटुंबात असलेल्या वादामुळे संपूर्ण गाव एखाद्या भयग्रस्त भागाप्रमाणे वाटते. शिवाय या भागाचे नाव देखील बदनामीच्या दिशेने वाटचाल करत असून या भागात शांतता, कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी एडीजीपींनी हा नवा प्लॅन अंमलात आणला आहे. एडीजीपींच्या या आवाहनाला आता दोन्ही कुटुंबीय कसा प्रतिसाद देतात, हे पाहावे लागेल.

Tags: