युक्रेन आणि रशिया यांच्यात झालेल्या युद्धानंतर ऑपरेशन ‘गंगा’ अंतर्गत मायदेशी परतलेल्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर पुढील शिक्षणाची समस्या आवासून उभी होती. यातील विजापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विजापूरमधील बीएलडीई शैक्षणिक संस्थेच्या श्री बी एम पाटील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षणाची संधी मिळाली. मात्र उर्वरित विद्यार्थी अद्यापही समस्यांच्या विळख्यात अडकले आहेत.
विजापूरमधील बीएलडीई शैक्षणिक संस्थेने युक्रेन रिटर्न विद्यार्थयांसंदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे संपूर्ण देशात या संस्थेने आदर्श घडविला. मात्र उर्वरित विद्यार्थ्यांसमोर समस्यांचे मोठे आव्हान उभारले आहे. युक्रेनमधून आलेल्या १२ विद्यार्थ्यांना बी एम पाटील वैद्यकीय महाविद्यातात शिक्षणाची संधी मिळाली. मात्र आता त्यांच्या पालकांसमोर पुढील शिक्षणाचा प्रश्न आवासून उभा आहे.
राज्य आणि केंद्र सरकारच्या उदासीनतेमुळे विद्यार्थी आणि पालकवर्ग चिंतेत आहे. आपल्या मुलांच्या पुढील शिक्षणासंदर्भात सरकारने अनेक आश्वासने दिली मात्र अद्याप त्या आश्वासनांची पूर्तता झाली नसून आपल्या मुलांची डॉक्टर होण्याची स्वप्ने हि स्वप्नेच राहणार का अशी चिंता पालकांनाही आता सतावू लागली आहे. या साऱ्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. शिक्षण मंत्री डॉ. के सुधाकर यांनीही विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासंदर्भात आश्वासने दिली. आता विद्यार्थ्यांसमोर पुढील शिक्षणाचा यक्षप्रश्न उभा असून सरकारने या प्रश्नावर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
विजापूरमधील केवळ १७ विद्यार्थ्यांचा हा प्रश्न नसून राज्यातील ६९० वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. युक्रेनमधून ऑनलाईन शिक्षण देणेही सध्या स्थगित झाले आहे. तेथील शैक्षणिक संस्थांकडून फी भरण्यासंदर्भात सूचना देण्यात येत असून अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर देखील प्रमाणपत्र मिळत नसल्याचे विद्यार्थी आणि पालकांचे म्हणणे आहे. शिवाय महाविद्यालये पुन्हा सुरु झाल्यास युक्रेनमध्ये पुन्हा जाऊन अभ्यास शिकणे हे कितपत सुरक्षित आहे? हा प्रश्न देखील विद्यार्थी आणि पालकांना सतावत आहे. कमी दरात वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यासाठी परदेशी जाव्या लागलेल्या विद्यार्थ्यांना भारतापेक्षाही अधिक दर शैक्षणिक शुल्क म्हणून मोजावा लागत आहे. यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी भारतातच कमी दरात वैद्यकीय शिक्षण उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
या प्रश्नावर केंद्र सरकारने देखील गांभीर्याने लक्ष पुरवून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. विजापूरमधील विद्यार्थ्यांचे पालक धर्मराय ममदापुर, रमेश पाटील, राजेंद्र पाटील, श्रीशैल वस्त्रद, मल्लनगौडा कवडीमट्टी, राजशेखर नाडगौड, विद्याधर न्यामगौडा, करणे आदींसह अनेक पालकांनी याप्रश्नी कर्नाटकचे मुख्यमंत्री, आरोग्य विभाग तसेच केंद्र सरकारने लक्ष पुरवून तातडीने तोडगा काढण्याची विनंती केली आहे.


Recent Comments