काँग्रेस पक्षात एक शिस्त आहे. आधी राज्यात निवडणूक होऊ द्या. निवडणुकीत काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाले तर कोणाला मुख्यमंत्री करायचे हे पक्षाचे हायकमांड ठरवतील असे बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.
बेळगावात आज, बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी काँग्रेस पक्षात मुख्यमंत्रीपदासाठी स्पर्धेच्या मुद्द्यावर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, आधी निवडणूक होऊ द्या, आमदार निवडून येऊ द्या आणि मग स्पर्धा होऊ द्या. त्याचवेळी त्यांनी डी. के.शिवकुमार मुख्यमंत्री होण्याबाबतच्या मुद्यावर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या, प्रथम 224 मतदारसंघातून 114-115 काँग्रेसचे आमदार निवडून आले पाहिजेत. त्यानंतर काँग्रेस पक्षाची विधिमंडळ गटाची बैठक होऊ द्या. काँग्रेस पक्षात एक शिस्त आहे, हायकमांड आहे. हायकमांड कोणाचे नाव सुचवते ते पाहू. विधिमंडळ गटात सर्वजण ज्याला नेता म्हणून स्वीकारतात तोच मुख्यमंत्री होतो.
त्याचवेळी, सिद्धरामौत्सवावरून मूळच्या काँग्रेस नेत्यांमध्ये असंतोष आहे का या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना, आ. लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, कोणीही नाराज नाही. पक्षात जुनी काँग्रेस किंवा नवी काँग्रेस असे काही नाही. राहुल गांधी स्वतः आघाडीवर उभे राहून प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. संपूर्ण काँग्रेस परिवार हा कार्यक्रम करत आहे. उदाहरणार्थ, मी हुबळी, धारवाडची प्रभारी आहे. अनेक लोक लोक समित्यांमध्ये काम करतात. 75 वर्षे वय, 40 वर्षे राजकारणात कर्तृत्व, स्वत:च्या शैलीत राज्यसेवा करणे ही अभिमानाची बाब आहे. सिद्धरामय्या साहेब हे आमचे निर्विवाद नेते आहेत. त्यांचा वाढदिवस आम्ही सगळे मिळून साजरा करतो आहोत. बेळगाव जिल्ह्यातूनही सिद्धरामौत्सवाला कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जाणार आहेत. केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली या संदर्भात यापूर्वीच फेरी बैठक झाली आहे. प्रत्येक मतदारसंघातून दोन हजार लोक जाण्याची शक्यता आहे. सतीशअण्णा जारकीहोळी हे संपूर्ण बेळगाव जिल्ह्याचे प्रभारी आहेत असे आ.हेब्बाळकर यांनी सांगितले.
दरम्यान, ‘सत्य सांगितले तर काँग्रेस नेते मरतील’ या मंत्री गोविंद कारजोळ यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना गोविंद कारजोळ माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत. ते राजकारणातील मोठे दिग्गज आहेत. त्यांचे विधान मीही पाहिले आहे. त्यांचे हे विधान ऐकून मलाही हसू येते. कोण खोटे बोलत आहे ते कळतेय. कुठे आहे काळा पैसा, कुठे आहेत 2 कोटी नोकऱ्या, कुठे कमी झाला भ्रष्टाचार..? मंत्री गोविंदा कारजोळ हे खोटे काय आणि सत्य काय यात गोंधळलेले आहेत असा उपहास त्यांनी केला.


Recent Comments