बेळगाव तालुक्यातील कडोली येथील श्री कलमेश्वर वारकरी भजनी मंडळ व ग्रामस्थांतर्फे पंचायत कार्यालयाच्या समोरील पिंपळ कट्टयाच्या झाडाला टांगलेली दही हंडी फोडुन पारंपारिक धार्मिक विधींसह मोठ्या जल्लोषात दहीकाला उत्सव साजरा करण्यात आला. गोपाळ काला गोड झाला, गोविंदाने गोड केला असे म्हणत काल्याचे वाटप करण्यात आले.
सालाबादाप्रमाणे वारकरी मंडळी आषाढी एकादशी वारीला पंढरपूरला जाऊन आल्यानंतर येणाऱ्या दुसऱ्या सोमवारी हा कार्यक्रम केला जातो. त्याला सुमारे अडीचशे वर्षाची परंपरा आहे. यानिमित्त काल, सोमवारी सायंकाळी गावातील कलमेश्वर मंदिर ते लक्ष्मी गल्ली व पेठ गल्लीहुन परत जुन्या विठ्ठल रुक्मिणी मदिर अशी सवाद्य दिंडी काढण्यात आली. गावातील भक्तांनी चुरमुरे, लाह्या, दुध व दही असा काला एकत्रीत गोळा करुन विधिवत पुजनानंतर वारकरी, भाविक, ग्रामस्थ व बाळगोपाळांच्या उपस्थितीमध्ये श्री कलमेश्वर देवाचे पुजारी कल्लाप्पा पट्टणशेट्टी यांच्या हस्ते दही हंडा फोडण्यात आली. काला प्रसाद वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. सध्या भात रोप लावणी जोरात सुरु असल्याने शेतकरी वर्गाची अनुपस्थिती जाणवत होती.
श्री कलमेश्वर भजनी मंडळाचे अध्यक्ष श्रीधर नाडगौडा व सौ. भारता मस्कार यांनी दही काला महोत्सवाबद्दल बोलतांना सांगितले की, आमच्या गावात या उत्सवाला सुमारे अडीचशे वर्षाची परंपरा आहे. दरवर्षी आषाढी वरील वारकरी पंढरपूरला जाऊन आल्यानंतर भक्तिभावाने दहीकाला उत्सव साजरा करण्यात येतो.
या प्रसंगी श्री कलमेश्वर भजनी मंडळाचे अध्यक्ष श्रीधर नाडगौडा, उपाध्यक्ष लक्ष्मण बुवा, गंगाराम लाड, संतराम दळवी, बळवंत डोंबले, कृष्णा मुतगेकर, कृष्णा मस्कार, पुंडलिक पाटील, कल्लाप्पा पाटील, नारायण लोहार, तम्माणि कासार, मारुती मारिहाळकर, बाळु पाटीलसह भजन मंडळ सदस्य, संत-वारकरी, भाविक, ग्रामस्थ व बाळ गोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments