संपूर्ण देशात अतिवृष्टीचा कहर होत असून देशातील अनेक भागात पावसाने थैमान घातले आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम भागात तसेच कोकण किनारपट्टीवर होणाऱ्या मुसळधार पावसामुळे उत्तर कर्नाटकात देखील अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत होण्याची वेळ आली असून हि सारी परिस्थिती लक्षात घेता विजापूर मधील बबलादी मठाची सिद्धू मूत्या भविष्यवाणी खरी ठरत असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत चालल्या आहेत.
देशासह राज्यातील अनेक जिल्ह्यात रविवारी पावसाने काहीशी उसंत घेतली आहे. मात्र महाराष्ट्रातील पश्चिम विभाग तसेच कोकण भागात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. उत्तर कर्नाटकातील कृष्णा नदी परिसरात बांधण्यात आलेल्या अलमट्टी जलाशयाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून जलाशयात १.३२ लाख क्युसेक पाण्याची आवक वाढली आहे. १.५० क्युसेक पाणी जलाशयातून केपीसीएल तसेच सर्व २६ दरवाजांच्या माध्यमातून नदीमध्ये सोडण्यात येत आहे. सध्या ५१९.६ मीटर उंच जलाशयात ५१७.०६ मीटर पर्यंत पाण्याचा साठा असून जलाशयात ८६.१९५ टीएमसी पाणीसाठा आहे. महाराष्ट्रात अशाच पद्धतीने पावसाचा जोर कायम राहिल्यास उत्तर कर्नाटकातील विविध जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती ओढवण्याची दाट शक्यता आहे.

विजापूरमधील बबलेश्वर तालुक्यातील बबलादी मठात सिद्धू मूत्या यांची भविष्यवाणी गेल्या ४ मार्च रोजी वर्तविण्यात आली होती. या भविष्यवाणीत अतिवृष्टी, दुष्काळ, देशातील सामाजिक, राजकीय वातावरण, नैसर्गिक आपत्ती अशा अनेक संदर्भात भाकितं करण्यात आली होती. हि भाकितं खरी ठरत असल्याचा दावा नेटकऱ्यांनी केला आहे. ४ मार्च रोजी वर्तविण्यात आलेल्या भविष्यवाणीसंदर्भात सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पोस्ट टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.
एकीकडे इतका पाऊस असूनही दुसऱ्या बाजूला दुष्काळाचा सामना करावा लागत असल्याचेही निदर्शनास येत आहे. कर्नाटकातील दुष्काळी भाग म्हणून परिचित असलेल्या विजापूर जिल्ह्यात पावसाविना शेतकऱ्यांचे हाल होतानाचे चित्र आहे. या भागात गुळ्ळव्वादेवीची पूजा करून उत्तम पीक पाण्यासाठी प्रार्थना करतात. गुळ्ळव्वा देवीच्या पूजनाने पीक पाणी उत्तम होते, असा येथील लोकांचा विश्वास आहे. मात्र पावसाअभावी बळीराजा अद्यापही चिंतेत आहे. या प्रत्ययावरून देखील बबलादी मठाच्या भविष्यवाणीवर पोस्ट टाकण्यात आले असून भविष्यवाणीप्रमाणे एकीकडे अतिवृष्टी तर दुसरीकडे दुष्काळ पडेल याचा प्रत्यय येत असल्याचे बोलले जात आहे.
एकीकडे अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूर परिस्थिती तर दुसरीकडे पावसाविना चिंताग्रस्त असलेला बळीराजा.. या एकंदर परिस्थितीमुळे बबलादी मठात करण्यात आलेली सिद्धू मुत्या भविष्यवाणी खरी ठरत असल्याचे बोलले जात आहे.


Recent Comments